Ghorpadi : रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार

उड्डाणपुलाच्या निविदेसह निधीच्या प्रस्तावाला स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज – घोरपडी येथील नियोजित रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाच्या निविदेसह निधीच्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी दिली आहे.  

पुणे-सोलापूर आणि पुणे-मिरज रेल्वेमार्गावर घोरपडी येथे असलेल्या रेल्वे गेटवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. याशिवाय घोरपडी गावातील रस्ता अरुंद असल्याने आणि रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असल्याने वाहतूक कोंडीत भरच पडते. या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी याठिकाणी उड्डाणपूल करण्याची मागणी नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर पालिकेने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन केले आहे. हा उड्डाणपूल पुणे-सोलापूर आणि पुणे-मिरज रेल्वे मार्गावर करण्यात येणार आहे. उड्डाणपुलासाठी सन 2019 च्या अंदाजपत्रकात 19 कोटी 60 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. या कामाचे पूर्वगणक पत्रक 50 कोटी रुपयांचे आहे. या उड्डाणपुलाचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागणार आहे.

अनेकदिवस रखडलेल्या या उड्डाणपुलाचे काम अखेर सुरू होत आहे. पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे काम मनोजा स्थापत्य या ठेकेदार कंपनीकडून करून घेण्याचा आणि त्यांच्यासोबत करारनामा करण्याच्या प्रस्तावासह 39 कोटी खर्चाचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.