Railway Second Reservation Charts : रेल्वे प्रवाशांच्या दुसऱ्या आरक्षण यादीसाठी टाळेबंदीपूर्वीची पद्धत पुन्हा लागू

ऑनलाईन आणि प्रवासी आरक्षण प्रणाली अशा दोन्ही ठिकाणी दुसरी आरक्षण यादी तयार होण्यापूर्वी तिकीट खरेदी करता येणार

एमपीसी न्यूज – रेल्वे प्रवाशांची दुसरी आरक्षण यादी तयार करण्यासाठी शनिवारपासून (दि. 10 ऑक्टोबर 2020) टाळेबंदीपूर्वीची पद्धत पुन्हा लागू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

कोविड संसर्गाआधीच्या सुरु असलेल्या पद्धतीनुसार प्रवाशांची पहिली आरक्षण यादी गाडी फलाटावरून निघण्याच्या वेळेपूर्वी किमान चार तास आधी तयार केली जात होती. त्यानंतर दुसरी आरक्षण यादी तयार होईपर्यंत, उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागांची तिकीटविक्री इंटरनेटद्वारे किंवा तिकीट खिडकीवरून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर केली जात असे.

गाडीच्या निश्चित वेळेपूर्वी 30 मिनिटे ते 5 मिनिटे या काळात दुसरी आरक्षण यादी तयार केली जात असे. या काळात तिकीट किंमतीच्या परताव्याच्या नियमांना अनुसरून आरक्षण रद्द करण्याची सुविधा उपलब्ध असे. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे दुसरी आरक्षण यादी गाडी सुटण्याच्या 2 तास आधी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

आता, प्रवाशांची सोय करण्याच्या उद्देशाने प्रदेश रेल्वे प्रशासनाने केलेल्या विनंतीनंतर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन, दुसरी आरक्षण यादी गाडी सुटण्याच्या 30 मिनिटे आधी तयार करायला परवानगी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, दुसरी आरक्षण यादी तयार व्हायच्या आधी, उपलब्ध असलेल्या रिकाम्या जागांची तिकीटविक्री इंटरनेटद्वारे किंवा तिकीट खिडकीवरून केली जाईल. हा बदल शनिवारपासून (दि. 10 ऑक्टो.)अंमलात आणण्यासाठी रेल्वे माहिती प्रणाली केंद्राने त्यांच्या सॉफ्टवेयरमध्ये आवश्यक बदल केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.