Lonavala News : जोरदार पावसाणुळे अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद 

एमपीसी न्यूज : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरड कोसळल्याने रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसाणुळे अंबरनाथ ते कर्जत, लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या.

पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून काही ठिकाणी शेती पिके वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या आहेत. गेल्या दहा तासापासून मुंबई- नागपूर दुरांतो एक्सप्रेस इगतपुरी पासून 18 किलोमीटर आधी उभी आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबई-नाशिक रेल्वे मार्गावर बुधवारी रात्री 10 च्या सुमारास कसारा घाटात दरड कोसळली आहे, त्यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या गाड्या खोळंबल्या आहेत, दरड हटविण्याचे काम सुरु आहे, रात्री पावसाचा जोर कायम होता, त्यामुळे दरड हटविण्यात अडथळे येत होते.

मध्य रेल्वेवरील टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते लोणावळा लोकलला सेवा ठप्प आहे. काल रात्री सोलापूरहून मुंबईकडे निघालेली सिद्धेश्वर एक्सप्रेस आज सकाळी बदलापूर जवळ येऊन थांबली आहे. रेल्वे मार्गावर पाच फुटापर्यंत पाणी असल्यामुळे गाडी थांबवण्यात आली आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणत्याही सुचना नसल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

लोणावळा खंडाळा येथे देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून तीन तासात 150 ते 175 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.