Pune News : उद्या पासून पुन्हा पाऊस !

0

एमपीसी न्युज : या आठवड्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता आणखी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उद्या सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यासारखा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत असून त्यामुळे पुढील आठवड्यात देखील राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले.नदी, नाल्यांना आलेले पूर आणि भिंती कोसळून काही नागरिकांचे बळी गेले. त्यातच आता सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने चिंता वाढली आहे. महाराष्ट्रावरून नुकताच गेलेला कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. आता 18 ते 21 ऑक्टोबरदरम्यान तमिळनाडू, आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि तेलंगणामध्ये मुसळधार, तर 20 ऑक्टोबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पट्ट्याची तीव्रता आणि त्याच्या प्रवासावर महाराष्ट्रावरील परिणाम ठरू शकणार असल्याचे मत हवामान विभागाने व्यक्त केले.

राज्यात या जिल्ह्यात पावसाची शक्यता
सोमवार- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.

मंगळवार- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ.

बुधवार- ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी,लातूर, उस्मानाबाद, संपूर्ण विदर्भ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.