Pune Rain Updates: पुण्यातही वादळासारखी स्थिती, अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले
Rain In Pune: Storm-like conditions in Pune too, trees uprooted in many places
एमपीसी न्यूज- कोकणात दाखल झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ पुण्यातही आले की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळपासूनच पुण्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. सोबतीला सोसायट्याचा वारा सुरू आहे. मागील चार दिवसांपासून पुण्यात वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. दरवाजा, खिडक्या लावून घेतल्यानंतरही वारा काही कमी होताना दिसून येत नाही. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत.
अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. कार, रिक्षा आणि दुचाकींवर झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
जोरात असलेल्या वाऱ्यामुळे दरवाजे आणि खिडक्यांचा खळखळाट जाणवत आहे. पुणे शहराला #NisargaCyclone चा थेट धोका नसला तरी शहरात आता ५० ते ६० ताशी वेगाने वारे वाहून लागण्याची शक्यता आहे.
सोबतच पावसाचा वेगही कायम राहील. पुणे महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे. पुणेकरांनी घराबाहेर पडू नये, आपल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी पार्क कराव्यात, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
खडकवासला धरणाजवळ असलेल्या लगतच्या परिसरात याचा परिणाम खूपच जाणवत आहे. शिवणे – उत्तमनगर, कोंढवे धावडे, न्यू कोपरे गावांत लोकांमध्ये या चक्रीवादळ संदर्भात खमंग चर्चांना उत आला आहे.
कोरोना प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रांत नागरिकांची वर्दळ थांबली आहे. पुणे शहराच्या काही भागांत आज झाडे पडण्याच्या घटना घडल्या. तर, काही भागांत वीजही गायब झाली होती.
पुण्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना आता चक्रीवादळ येणार की काय, अशी भीती पुणेकरांच्या मनात निर्माण झाली आहे. मागील 4 दिवसांपासून पुण्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
तीन दिवस अधूनमधून हजेरी लावणाऱ्या पावसाने आज सकाळपासूनच मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात आता पुणेकरांना दरवाजे, खिडक्या बंद करून घेण्याची वेळ आली आहे.