Weather Update : राज्यात पावसाची दडी, पुढील आठवड्यात पाऊस कमी

एमपीसी न्यूज : जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये दणक्यात आगमन झालेल्या पावसाने  सध्या दडी मारल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून तुरळक सरी पडण्यापलीकडे फारसा पाऊस झालेला नाही. हे चित्र पुढील आठवडाभर कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.  

मान्सूनचे वारे कमकुवत असल्यामुळे पुढील सात दिवस मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत, महाराष्ट्रासह दक्षिणेतील बहुतांश राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याचे पुणे हवामान विभागाने जाहीर केले आहे. याच काळात उत्तरपूर्व भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल वातावरण नाही. तसेच पश्चिम भागातील वार्‍यांची दिशा लक्षात घेता उत्तर पश्चिम भारत, मध्य भारतात 24 ते 26 जूनच्या दरम्यान मोठ्या पावसाच्यादृष्टीने अनुकूल स्थिती नाही. अरबी समुद्राकडून येणारे वारे कमकुवत असून त्यामुळे पुढील सात दिवस फारसा पाऊस होणार नाही.

कोकण, गोव्यात बर्‍याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.