Raj Thackeray On University Exam: हा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?, राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र

Raj thackeray writes letter to governor bhagat singh koshyari for third year university examination

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती इतकी भीषण आहे की देश गेले दोन महिने टाळेबंदीत आहे आणि सध्याची, किमान मुंबई आणि पुणे परिसरातील परिस्थिती पाहता हा भाग अजून किती काळ टाळेबंदीत राहिल याचे भाकित कोणीच करू शकत नाही. जरी टाळेबंदी शिथिल झाली तरी याचा अर्थ कोरोना संपला असा होत नाही. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे उपस्थित केला आहे.

विद्यापीठांच्या विविध शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात, कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव किती जबरदस्त आहे हे तुम्ही देखील जाणता, असे मी मानतो. मग इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात घालण्यामागचे नक्की प्रयोजन काय? टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचं होणारं अपरिमित नुकसान जाणून देखील देशाने इतकी मोठी टाळेबंदी झेलली का तर जीव वाचला तर पुढे सगळे शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.


राज ठाकरे पुढे म्हणाले, परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट विद्यार्थ्यांना पास करणे असे होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयांनी घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारावर किंवा त्यांना काही प्रोजेक्ट्स देऊन किंवा इतर अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांचा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करता येईल. मला खात्री आहे, अनेक शिक्षणतज्ज्ञांनी या विषयावर अनेक मार्ग तुम्हाला सुचवले असतील. पण जर ते नसतील तर आमचे शिष्टमंडळ विद्यापीठांना याविषयी नक्की मार्गदर्शन करेल असा सल्ला देखील त्यांनी राज्यपालांना दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात परीक्षा लांबणीवर टाकण्याची टांगती तलवार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर ठेवणे योग्य होणार नाही. त्यामुळे आधीच्या गुणांच्या आधारावर मुल्यांकन करून विद्यार्थ्यांचे प्रलंबित निकाल जाहीर करून त्यांच्या पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा केला पाहिजे. तसेच निव्वळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा रद्द कराव्यात. तसेच या प्रकरणी कुठल्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.