Pimpri : …राज ठाकरे शहरात आले अन् गेले!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे तरुणांना मोठे आकर्षण आहे. ठाकरे यांची सभा, कोणताही कार्यक्रम असल्यास तरुण मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी जमा होतात. त्यांचे भाषण ऐकण्याची मोठी उत्सुकता सर्वांना असते. चिंचवड, रहाटणी येथील एका खासगी जिमच्या उद्‌घाटनासाठी राज ठाकरे आज (शुक्रवारी) शहरात आले होते. त्यांनी जिमचे उद्‌घाटन केले अन्‌ कोणतेही भाषण न करता ते निघून गेले. त्यामुळे उपस्थितांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर व पूर्वाश्रमीचे मनसैनिक राहुल जाधव यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. तसेच त्यांचे आर्शिवाद देखील घेतले. 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तरुणवर्गामध्ये मोठी ‘क्रेझ’ आहे. त्यांचे असंख्य चाहते आहेत. राज ठाकरे यांचा कोणताही कार्यक्रम असो, त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी हमखास होते. ठाकरे यांना ऐकण्याची सर्वांना मोठी उत्सुकता असते.  मनसेचे पुण्यातील नेते किशोर शिंदे यांच्या चिंचवड, रहाटणी येथील ‘जिम’चे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते आज झाले. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाची वेळ दुपारी चारची होती. ठाकरे येणार असल्याने दुपारपासूनच कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमस्थळी जमा झाले होते. तब्बल तीन तासाच्या विलंबानंतर म्हणजेच सात वाजून पाच मिनिटांनी राज ठाकरे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. ठाकरे यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले.

शहराचे महापौर व पूर्वाश्रमीचे मनसैनिक राहुल जाधव यांनी ठाकरे यांचे पुष्पगु्च्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर ठाकरे यांनी ‘जिम’चे उद्‌घाटन केले. जिमची पाहणी केली आणि कोणतेही भाषण न करता ते निघून गेले. त्यामुळे त्यांना ऐकण्यासाठी जमलेल्या नागरिकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे उपस्थित होते. याशिवाय मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.