Rajasthan Political Crisis: पेच कायम!, पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु, काँग्रेस आमदारांची आज पुन्हा बैठक

Rajasthan Political Crisis: Sachin Pilot's efforts begin, Congress MLAs meet again today प्राप्तिकर विभाग व ईडीने गहलोत यांच्या निकटवर्तीयांच्या आस्थापनांवर धाडी घातल्या.

एमपीसी न्यूज- राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेस हायकमांड दबावात दिसत आहेत. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून पायलट यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, पक्षाने पुन्हा एकदा विधिमंडळ दलाची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हायकमांडकडून पाठवण्यात आलेल्या तीन सदस्यीय प्रतिनिधी मंडळात सहभागी असलेले रणदीपसिंह सुरजेवाला यांनी आज सकाळी 10 वाजता आमदारांची बैठक बोलावण्यात आल्याचे सांगितले.

सुरजेवाला यांनी म्हटले की, पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांना लिखित बोलावणे पाठवले जाईल. आम्ही सचिन पायलट आणि सर्व आमदारांना विधिमंडळ दलाच्या बैठकीला येण्याचे आवाहन करतो. आम्ही त्यांनी लिखित निमंत्रण देऊ. त्यांनी आमच्याशी चर्चा करावी. माझं त्यांना आवाहन आहे की, त्यांनी यावं आणि राज्यातील 8 कोटी जनतेची एकत्रित सेवा करण्यासाठी राजस्थानला मजबूत करावे, यावर चर्चा करावी.

दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या घरी आमदारांची बैठक बोलावून 106 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. सर्व आमदारांना बसद्वारे फेअर माउंट हॉटेलमध्ये नेले.

सूत्रांनुसार, बैठकीत 88 काँग्रेस आमदार हजर होते. उपमुख्यमंत्री सचिन पायलटसह 19 काँग्रेस आमदार गैरहजर राहिले. 30 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा करणारे पायलट आपल्या समर्थकांसह मानेसरच्या हॉटेलमध्ये आहेत. भाजप आणि पायलट गटाने बहुमत चाचणीची मागणी केली आहे.

दुसरीकडे, पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले. पायलट थेट सरकारविरुद्ध काहीच बोलत नाहीत. त्यांनी अधिकृत वक्तव्य दिले नाही.

दरम्यान, प्राप्तिकर विभाग व ईडीने गहलोत यांच्या निकटवर्तीयांच्या आस्थापनांवर धाडी घातल्या. काँग्रेस आमदार थांबलेल्या जयपूरच्या हॉटेलवरही धाड पडली. हे हॉटेल गहलोत यांच्या मुलाचे निकटवर्तीय रत्नकांत शर्मांचे आहे. काँग्रेस नेते राजीव अरोरा व धर्मेंद्र राठोड यांच्या ठिकाणांवरही धाडी पडल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.