IPL 2020 : राजस्थान रॉयल्सचा पंजाबवर सात गडी राखून विजय  

एमपीसी न्यूज – बेन स्टोक्सने केलेलं अर्थशतक व संजू सॅमसनच्या 48 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पंजाबवर सात गडी राखून विजय मिळवला आहे. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. त्यामुळे यापुढे प्ले-ऑफची शर्यत अधिक रंगतदार होणार आहे. 

ख्रिस गेलची तुफान फटकेबाजी, आणि लोकेश राहुल व निकोलस पूरन यांनी त्याला दिलेली उत्तम साथ यांच्या जोरावर पंजाबने राजस्थानविरुद्ध सामन्यात 185 धावांपर्यंत मजल मारली. विजयासाठी 186 धावांचं आव्हान मिळालेल्या राजस्थानची सुरुवात चांगली झाली सलामीला आलेल्या राॅबीन उथाप्पा आणि बेन स्टोक्स यांनी साठ धावांची भागीदारी केली. बेन स्टोक्स यांने 3 षटकार व 6 चौकाराच्या मदतीने 26 चेंडूत 50 धावा केल्या. तो सहाव्या षटकात बाद झाला. उथाप्पा देखील 30 धावा करुन बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी बाजू लावून धरली. संजू सॅमसन चांगली खेळी करत असतानाच तो 48 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर स्टिव्ह स्मिथने जोस बटलर सोबत कर्णधार पदाला साजेशी कामगिरी करत नाबाद 30 धावा केल्या त्याला बठलरने चांगली साथ दिली त्याने 22 धावा केल्या. पंजाबकडून अश्वीन आणि क्रिस जाॅर्डन यांनी 1-1 बळी घेतला.

त्याआधी नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरने आपला स्पर्धेतला आतापर्यंतचा चांगला फॉर्म कायम ठेवत पहिल्याच षटकात पंजाबच्या मनदीप सिंहला माघारी धाडलं.यानंतर मैदानात आलेल्या ख्रिस गेल व लोकेश राहुल यांनी   राजस्थानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. ख्रिस गेलने तुफान फटकेबाजी करत 6 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 63 चेंडूत 99 धावांची खेळी केली तर, राहुलने 46 धावांची खेळी केली. दुसऱ्या विकेटसाठी गेल व राहुल यांनी 120 धावांची भागीदारी केली.  लोकेश राहुल झेलबाद झाल्यानंतर आलेल्या निकोलस पूरनने ख्रिस गेलला साथ देत धावांची गती कायम राखली. शतकापासून अवघी एक धाव दूर असताना गेल आर्चरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. राजस्थानकडून बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चर यांनी 2-2 बळी घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.