RR vs CSK : चेन्नईवर 5 गडी राखून सुपर विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने  गाठले द्वितीय स्थान

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : प्ले ऑफसाठी अगोदरच पात्र असलेल्या राजस्थान रॉयल्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला धडाकेबाज सुरुवातीनंतरही केवळ 150 धावात रोखून आधी उत्तम कामगिरी केली आणि त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करताना अडखळत का होईना पण यशस्वी जैस्वाल, रवीचंद्रन अश्विनच्या धडाकेबाज फलंदाजी च्या जोरावर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आणि आपल्या अंकतालिकेतल्या स्थानातही एका नंबरचा फायदा करत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान होत साखळी स्पर्धेतला अंतीम सामना अविस्मरणीय केला आहे.अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रवीचंद्रन अश्विनला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

राजस्थान संघाला प्ले ऑफमध्ये द्वितीय क्रमांकाची जागा पक्की करण्यासाठी विजय अत्यावश्यक तर चेन्नई सुपर किंग्जला किमान आत्मसन्मान शाबूत ठेवण्यासाठी विजय अत्यावश्यक अशा स्थितीतल्या चुरशीच्या लढतीसाठी आजचा टाटा आयपीएल 2022 मधला साखळी फेरीतला 68 वा सामना मुंबईच्या ब्रेबोर्न मैदानावर खेळवला गेला ज्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण चेन्नई संघाची सुरुवात अतिशय खराब झाली.

सलामीवीर ऋतुराज गायकवाड आज केवळ 2 धावा काढून बोल्टच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनच्या हातात झेल देवून बाद झाला. आणि चेन्नई संघाला पहिला मोठा धक्का बसला. मात्र यानंतर आलेल्या मोईन अलीने तुफानी फलंदाजी करत राजस्थान रॉयलच्या सर्वच गोलंदाजांना पळता भुई थोडी केली. त्याचा आवेश इतका जोरदार होता की त्याने केवळ 19 चेंडूत वेगवान अर्धशतक पूर्ण केले. त्याने बोल्टच्या एकाच षटकात काढल्या 26 धावा काढताना एक षटकार आणि 5 चौकार मारत या महान गोलंदाजाच्या चिंधड्या उडवल्या.

या आक्रमक फलंदाजीने चेन्नई संघाचे ऋतूराजच्या बाद होण्याने आलेले दडपण एका क्षणात भुर्रर्र पळून गेले. या जोडीने केवळ 39 चेंडूत 83 धावांची वेगवान भागीदारी केली. ज्यात कॉन्व्हेचा वाटा होता 16 धावांचा. अखेर रवीचंद्रन अश्विनने कॉन्व्हेला पायचीत करुन ही जोडी फोडली,यावेळी चेन्नईची धावसंख्या होती 2बाद 85,ज्यात फक्त 5 धावांची भर पडलेली असताना जगदीशनला मकॉयने 1 धावेवर बाद करुन तंबूत परत पाठवले आणि आपल्या संघाला तिसरे यश मिळवून दिले.

मात्र दुसऱ्या बाजूने मोईन अली एक अप्रतिम आणि अविस्मरणीय खेळी आज खेळत होता,दुर्दैवाने  त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळत नव्हती त्यातच  जगदीशनच्या जागी आलेल्या अंबाती रायडूही विशेष योगदान न देता फक्त 3 धावा काढुन चहलला आपली विकेट देवून तंबुत परतला. आणि चेन्नईची अवस्था 11 व्या षटकात 4 बाद 95 अशी झाली. यानंतर मात्र मोईन अली आणि त्याला साथ द्यायला आलेल्या कर्णधार धोनीने 51 धावांची भागीदारी करुन डाव सावरला. पण ही भागीदारी खूप मंदगतीने झाली. त्यामुळे एक वेळा खूप मोठया धावसंख्येकडे अग्रेसर होत असलेल्या चेन्नईला आपल्या 20 षटकात 6 गडी गमावून  केवळ 150 च धावा करता आल्या.

19 व्या षटकाच्या शेवटच्या षटकात 26 धावा करुन धोनी तर 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अप्रतिम 93 धावा करुन मोईन अली बाद झाले अन चेन्नईला फक्त 150 धावांवरच समाधान मानावे लागले. मोईन अलीने आयपीएल मधले सर्वात वेगवान दुसरे अर्धशतक नोंदवले तर केवळ 57 चेंडूत 93 धावा करताना 13 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी धोनीने मात्र 28 चेंडूत फक्त 26 धावा करुन संघाला अपेक्षित धावगती मिळवून देण्यात चांगलाच अडथळा आणला.

पहिल्या पॉवर प्ले मध्ये 70 धावा करणाऱ्या चेन्नईला नंतरच्या 14 षटकात फक्त 80 धावा देत 150 वर रोखून राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. चहल ,मकॉय ने प्रत्येकी दोन तर बोल्ट व अश्विनने प्रत्येकी एक गडी बाद करत चांगली कामगिरी केली.

अंतीम चार संघात अगोदरच असलेल्या पण तीन नंबर वरुन दोन नंबरवर जाण्यासाठी राजस्थानला आज रॉयल विजय हवा होता. गोलंदाजांनी आपल्या परीने त्यात चांगलेच यश मिळवल्यानंतर आता उर्वरित जबाबदारी पार पाडायची जबाबदारी होती फलंदाजांवर. आणि त्यासाठी हवी होती उत्तम सुरुवात.त्यासाठी मैदानात उतरले ते ऑरेंज कॅप चा मानकरी जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल. यशस्वी जैस्वालने मुकेश चौधरीच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन खणखणीत चौकार मारत सुरुवात तरी आश्वासक केली. मात्र दुसऱ्या षटकात सिमरजीत सिंगने बटलरला 2 धावांवर बाद करुन आपल्या संघाला पहिले यश मिळवून देताना राजस्थानला पहिला रॉयल धक्काही दिला.

सुरुवातीला जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या बटलरची बॅट मागील काही सामन्यात मात्र शांत झाली आहे. आजही त्याचीच प्रचिती आली. ये है क्रिकेट, हे क्षणात एखाद्या रावाला रंक तर रंकाला राव करते. बटलरच्या त्या स्फोटक फलदाजीची खरी गरज राजस्थानला आता आहे अन नेमके याचक्षणी तो अपयशी ठरत आहे. मात्र त्याचा तो सुरुवातीचा फॉर्म लवकरच परत यावा अशी अपेक्षा राजस्थान रॉयल्सचे असंख्य चाहते आता करत असतील.

तो बाद झाल्यानंतर आलेल्या संजू सॅमसनने जैस्वालला साथ देताना दुसऱ्या गड्यासाठी 51 धावांची अर्धशतकी भागीदारी करुन आपल्या विजयाकडे दमदार पाऊल टाकले आहे असे वाटत असतानाच कर्णधार संजू 15 धावा करून सॅटनरच्या गोलंदाजीवर त्याच्याच हातात झेल देवून बाद झाला आणि पाठोपाठ मोईन अलीने पडीकलला वैयक्तिक तीन धावांवर बाद करुन राजस्थान रॉयल्सला तिसरा मोठा धक्का दिला.

यावेळी राजस्थान रॉयल्सची धावसंख्या 12 व्या षटकात 3 बाद 76 अशी झाली होती.मात्र या धक्क्याने जराही विचलित न होता यशस्वी जैस्वालने आपले तिसरे आयपीएल अर्धशतक पूर्ण करुन डाव सावरण्यासाठी प्रयत्न चालूच ठेवले. यावेळी तो राजस्थानला रॉयल विजय मिळवून देण्यात यशस्वी होईल असे वाटत असतानाच आपले अर्धशतक बाद झाल्यानंतर त्यात 9 धावांची भर घालून तो प्रशांत सोळंकीच्या गोलंदाजीवर वैयक्तिक 59 धावा करुन बाद झाला. त्याने 44 चेंडूत 8 चौकार आणि एक षटकार मारत या धावा ठोकल्या.

तो बाद झाल्यानंतर आलेल्या हेटमायरलाही सोळंकीनेच बाद केले आणि सामना एकदम रोमांचक अवस्थेत आला,यावेळेस राजस्थानच्या 17 व्या षटकात 5 बाद 112 धावा होत्या. विजयास अजूनही 39 धावा हव्या होत्या. त्या करायची जबाबदारी होती रवीचंद्रन अश्विन आणि रियान पराग या जोडीवर. ती त्यांनी सार्थ पार पडताना अप्रतिम फलंदाजी करत आपल्या संघाला 5 गडी राखून विजय मिळवून दिला.

खास करुन रवी अश्विनने एक अविस्मरणीय खेळी करताना केवळ 23 चेंडूत 2 चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद 40 धावा केल्या. त्याच्या या फटकेबाजीने चेन्नईच्या हातातोंडाशी आलेला घास राजस्थान रॉयल्सने हिरावून घेत एक जोरदार विजय तर मिळवलाच पण या विजयासोबत त्यांनी अंतिम चार संघात थेट दुसरा क्रमांकही प्राप्त केला आहे.

गुजरात, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे तीन संघ टाटा आयपीएल 2022 मधल्या अंतीम चारमधले तीन संघ असल्याचे आज स्पष्ट झाले आता चौथ्या क्रमांकासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघात चुरस आहे, या पराभवाने चेन्नईचा या प्रवासातला सामना हारल्याने दुःखद शेवट झाला आहे.

संक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज
6 बाद 150
मोईन 93,कॉन्व्हे 16,धोनी 26,
मकॉय 20/2,चहल 26/2,अश्विन 28/1
पराभूत विरुद्ध

राजस्थान रॉयल्स
19.4 षटकात 5 बाद 151
यशस्वी जैस्वाल 59 सॅमसन 15,रवीचंद्रन अश्विन नाबाद 40,रियान पराग नाबाद 10,
मोईन अली 21/1,सोळंकी 20/2,सिमरजीत 18/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.