IPL 2021 : राजस्थानचा किंग्ज 11 पंजाबवर रोमहर्षक थरारक पण ‘रॉयल’ विजय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : 19 व्या षटकापर्यन्त सहज विजयाचा प्रबळ दावेदार वाटत असणाऱ्या किंग्ज पंजाब 11 ने पुन्हा एकदा आततायी खेळ करत हातातोंडाशी आलेला विजय प्रतिस्पर्धी संघांला शब्दशः दान केला. आणि सहज 100% आठ गडी राखून विजय मिळवतील असे वाटत असताना दोन केवळ दोन धावांनी पराभव स्विकारला. याच सोबत क्रिकेट हा किती अनिश्चिततेचा खेळ आहे याची सुद्धा पुन्हा एकदा प्रचीती क्रिकेट रसिकांना अनुभवता आली.

आयपीएल 2021 च्या 32 व्या आजच्या सामन्यात पंजाबच्या अर्शदीप सिंग या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सचा अर्धा संघ केवळ 32 धावा देत तंबूत पाठवताना 20/20 मधली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आणि त्याच्या या कामगिरीला सोनेरी जोड देत किंग्ज 11 पंजाबच्या सलामीवीरांनी विजयाचा रचलेला पाया मात्र शेवटच्या षटकातल्या आत्मघाती फलंदाजीपायी कोसळला.

दुबई येथे झालेल्या आजच्या सामन्यात किंग्ज 11 पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थान रॉयल्सकडून नवोदित तरुण फलंदाज यशस्वी जैस्वाल हा एव्हीन लेविसच्या जोडीला सलामीला आला. या जोडीने आश्वासक आणि आक्रमक सुरुवात करताना केवळ 5 षटकातच अर्धशतकी सलामी देताना चांगली सुरुवात करत मोठया धावसंख्येची आशा संघाला दाखवली. लेविस तर जबरदस्त खेळत होताच त्याने 21 चेंडुत सात चौकार आणि एक षटकार मारत आक्रमक अशा 36 धावा जोडल्या पण संघांच्या 54 धावा झाल्या असताना तो अर्शदिपची शिकार झाला.

त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला,पण तो आजही विशेष काही कामगीरी करू शकला नाही आणि केवळ चार धावा करून तो ईशान पोरेलच्या चेंडूवर यष्टीरक्षक राहूल कडे झेल देऊन बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या लिविंगस्टोनने जवळपास दीडशेच्या स्ट्राईक रेटने 17 चेंडुत दोन चौकार आणि एक षटकार मारत 25 धावा केल्या खऱ्या पण हीच अतिआक्रमकता त्याला नडली आणि तो सुद्धा अर्शदीपचीच शिकार झाला.

एका बाजूने अशा विकेट्स पडत असताना सुद्धा लेविस, लिविंगवुड इतकेच किंबहुना त्यांच्याहुन अधिक आत्मविश्वासाने यशस्वी जैस्वाल खेळत होता, तो आपले अर्धशतक करण्यात यशस्वी होईल असे वाटत असतानाच केवळ दुर्दैवाने तो 49 धावांवर हरप्रित ब्रारच्या चेंडूवर बाद झाला, पण त्यापूर्वी त्याने केवळ 36 चेंडूत 49 धावा करताना सहा चौकार आणि दोन उत्तुंग षटकार ठोकत आपल्या नावाला साजेशी फलंदाजी केली. त्यावेळी राजस्थान रॉयल्सच्या केवळ 14 षटकातच 136 धावा झाल्या होत्या आणि त्यांचे आणखी सहा गडी बाकी होते. यावेळी राजस्थान रॉयल्स एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहेत असे वाटत होते.

त्यातच महिपाल लेमरोलने एकदम धुवांधार फलंदाजी सुरू केली होती. त्याने केवळ 17 चेंडुतच घणाघाती 43 धावा करताना चार षटकार आणि दोन चौकार ठोकले खरे पण दुसऱ्या बाजुने त्याला फारसी साथ न मिळाल्याने व त्याचसोबत मोहम्मद शमी आणि अर्शदीपच्या सिंगच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ सर्वबाद 185 धावाच करू शकला. शमीच्या अनुभवी गोलंदाजीला अर्षदीपने सुद्धा तोलामोलाची साथ दिली आणि आयपीएल मधील आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना केवळ 32 धावा देत पाच गडी बाद करण्याचा भीम पराक्रम करून दाखवला. त्याला शमीने तीन बळी मिळवत उत्तम साथ दिली आणि दोनशेहून अधिक धावा राजस्थान रॉयल्स सहज गाठतील असे वाटत असतानाच 185 धावांतच रोखण्यात यश मिळवून मोठी कामगिरी केली.

186 धावांचे विजयी लक्ष डोळ्यापुढे ठेवून खेळणाऱ्या किंग्ज 11 पंजाबच्या के एल राहूल आणि मयंक अगरवाल या यशस्वी जोडीने सहा षटकातच अर्धशतकी सलामी नोंदवून चांगली सुरुवात केली खरी पण यादरम्यान त्यांना राजस्थान रॉयल्सच्या क्षेत्र रक्षकांनी तीन झेल सोडून त्यांच्या भागीदारीत भर घातली असे म्हटले तर ते काही वावगे ठरणार नाही त्यातच कर्णधार संजू सॅमसनने एक चुकीचा डीआरएस घेऊन स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. याचा फायदा राहुल आणि मयंकने करुन घेतला नसता तरच नवल ठरले असते. बघताबघता त्यांनी अर्धशतकी, पाऊणशतकी अन शतकी नाबाद भागीदारी करताना विजयाकडे वाटचाल सुरू ठेवली.

राहुलच्या तुलनेत मयंक अतिशय सुंदर आणि आक्रमक फलंदाजी करत होता. बघताबघता त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले सुद्धा, त्याला तशीच साथ कर्णधार राहुल स देत होता,तो सुद्धा आपले अर्धंशतक पूर्ण करेल असे वाटत असतानाच 49 धावांवर साकरीयाच्या चेंडूवर कार्तीक त्यागीच्या हाती सोपा झेल देवून बाद झाला. पण त्या दरम्यान त्याने शिखर धवनच्या या मोसमातील सर्वोच्च 380 धावांची बरोबरी केली होती अन ऑरेंज कॅप सुद्धा संयुक्तरित्या मिळवली होती.

तो बाद झाल्यानंतर थोड्याच वेळात मयंक पण 67 धावा काढुन बाद झाला पण तोपर्यंत सामना बऱ्यापैकी किंग्ज 11 पंजाबच्या हातात आला असेच वाटत होते. त्यातच संजू सॅमसनने गोंधळून रियान परागला गोलंदाजी दिली त्या षटकात निकोलस पुरन आणि मारक्रमने सोळा धावा ठोकून विजय आणखी जवळ आणला. यानंतर विजयाची केवळ औपचारिकताच बाकी होती ती ही जोडी सहज पुर्ण करेल असे वाटत असतानाच शेवटच्या षटकात केवळ चार धावा करण्यात आलेले अपयश पंजाब 11 संघाला आणि त्यांच्या चाहत्यांनाही प्रचंड निराश करून गेले.

राजस्थान रॉयल्सची मात्र अक्षरशः लॉटरी लागली, नवोदित कार्तिक त्यागीने प्रचंड दबावाखाली शेवटच्या षटकात जबरदस्त आणि अविस्मरणीय कामगिरी करत आपल्या संघाल अविश्वसनियम विजय मिळवून देत सामनावीर पुरस्कार तर मिळवलाच पण त्याचसोबत अंकतालीकेत सुद्धा आपल्या संघाची मुंबई इंडियन्स सोबत बरोबरी करत संयुक्त चौथे स्थान सुध्दा मिळवून दिलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.