Pune : पीआयसीतर्फे नावीन्यपूर्ण संशोधनासाठी राजेंद्र मोटुरू यांचा सन्मान

पीआयसीच्या वतीने आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ मध्ये देशभरातील १९ संशोधकांच्या संशोधनाचा सहभाग

एमपीसी न्यूज –  जगभरात अनेक  कारणांमुळे पाण्याचे होत असलेले दूषितीकरण ही सर्वात मोठी समस्या आहे. याकडेच लक्ष वेधत आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम येथून आलेल्या राजेंद्र प्रसाद मोटुरू यांनी बॅटरीवर चालणारे, वीजविरहित, सहज कोठेही नेता येण्याजोगे व सौरऊर्जेवर चालणारे जलशुद्धीकरण यंत्र तयार केले आहे. यामुळे कोणत्याही पाण्याचे
सौरऊर्जेच्या मदतीने शुद्धीकरण करून ते वापरता येणे शक्य होणार आहे. याच यंत्राच्या निर्मितीसाठी मोटूरू यांचा ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी) च्या वतीने आयोजित सातव्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ (एनसीएसआय) मध्ये सन्मान करीत त्यांना गौरविण्यात आले आहे.

देशभरातील शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील नावीन्यपूर्ण संशोधनांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी)च्या वतीने सातव्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ (एनसीएसआय) चे  आयोजन यशदा(बाणेर) येथे करण्यात आले. या परिषदेत शहरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील नावीन्यपूर्ण संशोधनातील प्रत्येकी एक अशा तीन संशोधकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा आणि पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी यावेळी उपस्थित होते.

पुरस्काराने सन्मानित झालेल्यांमध्ये आदिवासी विभागातील राजेंद्र प्रसाद मोटुरू यांच्या सौर जलशुद्धीकरण यंत्राचा समावेश आहे. वाहणा-या कोणत्याही अशुद्ध पाण्यावर सौरऊर्जेच्या मदतीने प्रक्रिया करणारे हे प्युरीफायर १२ तासात तब्बल ६०० ते ७०० लिटर पाणी शुध्द करते. इतकेच नाही तर कोणत्याही भूभागावर हे यंत्र घेऊन जाता येते यामुळे ग्रामीण भाग, शाळा, रुग्णालये, पंचायती ऑफिसेस आणि सार्वजनिक ठिकाणी त्याचा प्रभावी वापर होऊ शकतो. याबरोबरच ग्रामीण विभागात हिमोग्लोबीन, ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल यांची शरिरामधून रक्त न काढता तपासणी करणारे यंत्र पश्चिम बंगालच्या
पार्थप्रतीम दसमहापात्रा यांनी तयार केले असून याद्वारे वर नमूद चाचण्या लवकरात लवकर करणे शक्य होऊ शकते.

याशिवाय शहरी विभागात कर्नाटकाच्या मयूर शेट्टी यांचे रक्त, पेशी यांबरोबर बायोलॉजिकल अवयवांची वाहतूक करताना वातावरण स्थिर ठेवणा-या ‘संजीवनी’ या उपक्रमाचा देखील समावेश या पुरस्कार्थी संशोधनामध्ये आहे. या उपकरणाने वाहतूक करीत असताना २ ते ८ डिग्री चे तापमान स्थिर ठेवले जाते. या तीन संशोधनाबरोबरच शेती, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण या विषयांशी संबंधित संशोधनांचा या परिषदेत सहभाग होता.

‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (पीआयसी), ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ आणि नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यासाठी देशभरातील १०० हून अधिक संशोधकांनी नोंदणी केली होती. या परिषदेसाठी निवड झालेल्या १८ संशोधकांना यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले आहे.

याशिवाय सर्व संशोधकांनी आपले संशोधनाचे सादरीकरण यावेळी उपस्थितांसमोर केली. उपस्थितांसमोर मुख्यत: देशभरातील मोठ मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जेणेकरून या नावीन्यपूर्ण संशोधनांना भविष्यात मदत मिळून
ते संस्थांच्या सीएसआर मार्फत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचू शकेल. संशोधकांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच त्यांचे संशोधन अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावे हाच या राष्ट्रीय परिषदेमागील मुख्य हेतू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.