Rajesh Patil Transferred : सरकार बदलताच आयुक्त बदलले; बरेच दिवस ‘या’ कारणांनी वादात सापडले होते आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची अखेर (Rajesh Patil Transferred) आज (मंगळवारी) मुदतपूर्व बदली झाली. विविध कारणांनी चर्चेत राहिलेले आणि वादग्रस्त ठरलेल्या पाटील यांची अवघ्या दीड वर्षात बदली झाली. त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती झाली. दरम्यान, सत्ता बदल होताच पाटील यांची बदली होणार असल्याचे पहिले वृत्त ‘एमपीसी न्यूज’ने दिले होते. आज अखेर पाटील यांच्या बदलीचा आदेश महापालिकेत धडकला.

ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी 15 फेब्रुवारी 2021 रोजी नियुक्ती झाली होती. पाटील प्रतिनियुक्तीने 5 वर्षासाठी महाराष्ट्रात आले आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाटील यांची नियुक्ती झाली होती. आयुक्त पाटील यांचे सुरुवातीपासूनच लोकप्रतिनिधी, पदाधिका-यांशी खटके उडायला लागले. नगरसेवकांनाही भेटण्यासाठी वेटिंगवर थांबविले जात होते. त्यामुळे आयुक्त तुसड्याने वागत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. पार्किंग पॉलिसी सुरु केली. पण, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. केवळ आरंभशूर अशी त्यांची ओळख निर्माण झाली. रंगरंगोटी, सुशोभीकरणावरच आयुक्तांचा भर राहिला.

नागरिकांशीही (Rajesh Patil Transferred) आएएसच्या तोऱ्यात ते वागत होते. नागरिकांना भेटायचे नाहीत. तत्कालीन भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांना सणासुदीच्या काळात तुरुंगात टाकले. आयुक्त पाटील हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कलानुसार कारभार करत असल्याचे आरोप झाले. आयुक्तांच्या कार्यशैलीबाबत भाजपच्या मोठ्या तक्रारी होत्या. महापालिकेतील नगरसेवकांचा 13 मार्च 2022 रोजी कार्यकाळ संपला. त्यानंतर आयुक्त राजेश पाटील यांचीच प्रशासकपदी नियुक्ती झाली.

प्रशासकपदी नियुक्ती होताच आयुक्तांनी अंदाधुंद कारभार सुरु केल्याचा आरोप होत होते. स्थायी समितीत कोट्यवधींच्या कामांच्या मंजुरीचा धडाका लावला. भाजपने तहकूब केलेले यांत्रिकी पद्धतीच्या विषयाला मान्यता दिली. त्याची निविदाही प्रसिद्ध केली. महापालिका इमारतीचीही निविदा प्रसिद्ध केली. रेल्वेतून आलेले अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना सोबत घेऊन स्थायीत धुमाकूळ घातल्याची तक्रारी आल्या. दोघेही कोणालाच जुमानत नव्हते. लोकप्रतिनिधींनाही दाद देत नव्हते.

ओडिशा केडरचे असलेल्या पाटील यांना शहराची नाळ सापडलीच नाही. त्यांच्याबाबत अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे देखील तक्रारी गेल्या. रयत विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबतही चुकीच्या पद्धतीने संवाद केल्याची तक्रार झाली होती. आयुक्त राजेश पाटील प्रशासनावर छाप पाडू शकले नाहीत. सातत्याने उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या केल्या. स्थापत्य विभागातील तक्रारी असलेल्या अधिका-यांना पुन्हा मूळ जागी नियुक्त्या दिल्या. आयुक्तांची कार्यशैली सुरुवातीपासूनच भाजपला रुचली नाही.

दरम्यान, राज्यात सत्ता बदल झाला. महाविकास आघाडीचे (Rajesh Patil Transferred) सरकार जाऊन शिंदे गट आणि भाजपचे सरकार आले. सरकार बदलताच आयुक्तांच्या कार्यशैलीबाबतच्या भाजपने वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे पाटील यांची मुदतपूर्व बदली होणार हे निश्चित होते. अखेर आज त्यांच्या बदलीचा आदेश महापालिकेत धडकला आणि आयुक्तांची दीड वर्षाची कारकिर्द संपली. पाटील यांची महापालिकेतील अल्प कारकिर्द विविध कारणांनी वादग्रस्त ठरली.

PCMC Breaking News : महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची बदली; शेखर सिंह नवे आयुक्त

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.