Corona Third Wave : राज्यात कोरोनाची तिसरी लाट, जानेवारी अखेरपर्यंत उच्चांक – राजेश टोपे

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही लाट उच्चांक गाठण्याची शक्यता आहे असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर रुग्णसंख्येचा आलेख कमी होण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले. जालन्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘राज्यात तिसरी लाट सुरू झालेली आहे. काल 45 हजार रुग्ण आढळले, आजही त्यात वाढ होईल. ही वाढ कुठपर्यंत जाईल, केव्हा उच्चांक गाठेल? जसं दुसऱ्या लाटेत दररोज 65 हजार रुग्ण आढळत होते. तो त्या लाटेचा उच्चांक होता. तसं या तिसऱ्या लाटेचा उच्चांक कोणता आहे? दररोज किती बाधित रुग्ण आढळतील, त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे. तो कदाचित या महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा शेवटापर्यंत उच्चांक गाठेल असं वाटतं. त्यानंतर तो खाली जाईल असंही तज्ज्ञांचं मत आहे.’

राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कोणताही ताण नसून 85 टक्के रुग्ण हे कोणतीही लक्षणं नसल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात आता जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करण्यात येणार असून टेस्टिंगची संख्या वाढवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. देशभरात क्वारंटाईनचा कालावधी हा सातच दिवस राहणार, त्यात कोणताही बदल होणार नाही असं केंद्राने सांगितल्याचं राजेश टोपे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.