Rajgurunagar : आळंदी, चाकण, राजगुरुनगरसह 19 गावांमध्ये सोमवारपासून 10 दिवसांचा लॉकडाऊन

10 days lockdown from Monday in 19 villages including Alandi, Chakan, Rajgurunagar

एमपीसीन्यूज : खेड तालुक्यातील तीन नगरपरिषदा व कंटेनमेंट झोनमधील 19 गावांमध्ये 13 तारखेपासून दहा दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्णय झाल्यास संपूर्ण तालुका लॉकडाऊन करण्याचे नियोजन होऊ शकते, असे प्रांताधिकारी  संजय तेली आणि आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले.

आमदार मोहिते पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मध्यवर्ती बँक राजगुरुनगर शाखेच्या सभागृहांमध्ये कोरोना संक्रमणाला आळा घालण्याकरीत उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, माजी सभापती अरूण चांभारे, गटविकास अधिकारी अजय जोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, विधीज्ञ सुखदेव पानसरे यांच्यासह सार्व शासकीय विभागांचे अधिकारी व पोलीस निरीक्षक आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या, दवाखान्याची व महाळुंगे कोविड सेंटरची स्थिती याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कोराना रुग्णांमध्ये होणारी वाढ रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करण्यात आली.

त्याचप्रमाणे कोविड आरोग्य केंद्र नव्याने तात्काळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील तीन नगरपरिषदा व कंटेनमेंट झोनमधील 19 गावे 13  तारखेपासून दहा दिवसांसाठी लॉक डाऊन करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्णय झाल्यास संपूर्ण तालुका लॉकडाऊन करण्याचे नियोजन होऊ शकते, असे आमदार मोहिते पाटील यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्षा पानसरे यांनी आळंदी आरोग्य केंद्राची तीन वेळा पाहणी करून देखील आरोग्य केंद्रामध्ये रूग्णांसाठी अजूनही सोयीसुविधा उपलब्ध न केल्याबाबत नाराजी व्यक्त केली. तेथे सीएसआरमधून मदत घेऊन नवीन कोविड सेटर चालू करण्याचे चर्चा करण्यात आली.

चांडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह येथे स्वतंत्र सीसीसी केंद्र उद्यापासून सुरु होणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच खाजगी डॉक्टरांना सोबत घेऊन चाकण,आळंदी, राजगुरुनगर येथे डीसीएचसी सेंटर सुरू केल्यास तेथे खाजगी डॉक्टर रुग्ण सेवा करण्यास तयार असल्याचे आमदार मोहिते पाटील यांनी सुचविले.

खेड तालुक्यातील कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी 10  लाख रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्य, त्यामध्ये थर्मल स्कॅनर, न्यूबीलायझर, डिस्पोजल मास्क,डिस्पोजल कॅप, संनिटायझर, हॅन्ड ग्लोजचे वितरण करण्यात आले.

महाळुंगे कोविड सेंटर, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र व वाफगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी 1 रुग्णवाहिका यासाठी एकूण 50  लाख रुपये स्थानिक विकास निधीमधून साहित्य उपलब्ध करून दिल्याची माहिती आमदार मोहिते पाटील यांनी दिली.

लॉकडाउनमध्ये कंपन्या बंद राहणार नाहीत. कामावर जाणाऱ्या कामगारांना पास देण्यात येतील. किराणा, भाजीपाला, दवाखाने, औषध दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे या बैठकीत ठरले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.