Rajgurunagar : पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? – अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

राजगुरुनगर-खेड येथे दुसरी सभा; शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेऊन राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात

एमपीसी न्यूज – आज राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करत आहेत. पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा थेट सवाल राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला करत टोला लगावला.

शिवस्वराज्य यात्रेतील दुसरी सभा राजगुरुनगर – खेड येथे पार पडली. नव्या स्वराज्याच्या नव्या लढ्यासाठी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरीवरुन त्यांचा आशीर्वाद घेऊन आज करण्यात आली.

  • यावेळी ज्येष्ठ नेते व माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, आमदार विदया चव्हाण, विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, महेश चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार विलास लांडे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवारी ३७० कलम काढले त्याचे मी समर्थन करतो. चांगल्याला चांगलंच बोललं पाहिजे. आता पाकव्याप्त काश्मीर आपल्यात यावा ही भारतीयांची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने या सरकारने पाऊले उचलली पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. सरकार ज्याच्याकडे असते त्याकडे जरब पाहिजे परंतु यांच्यामध्ये ती धमकच नाही असा टोला लगावला.

  • स्थानिकांना 75 टक्के जागा दिल्या पाहिजेत, यासाठी सरकारमध्ये आल्यावर लगेच कायदा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ७१ हजार कोटीची कर्जमाफी आम्ही दिली. परंतु हे तीन वर्ष कर्जमाफी देत आहेत, ही कसली यांची कर्जमाफी आहे? असा संतप्त सवाल करतानाच पश्चिम महाराष्ट्रावर या सरकारने जास्त अन्याय केला आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केला. ओबीसी, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण देतो सांगितले परंतु दिले नाही ही सगळी बनवाबनवी सुरु आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, भाजप सेनेचे हे दळभद्री सरकार उलथून टाकायचे आहे. रयतेचे राज्य आणण्याचा निश्चय करुया. जनतेसाठी काय करणार? हे सांगत नाही उलट येणार्‍या निवडणूकीत आमचा मुख्यमंत्री, मीच मुख्यमंत्री असणार आहे. यासाठी या यात्रा आहे.

  • दोन्ही यात्रा ज्या पक्षांनी काढल्या त्यांना जनतेचं दु:ख यांना दिसत नाही. तो फक्त दिसतो तो राष्ट्रवादी काँग्रेसला. जनतेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरुन सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभच आता बोलू लागलाय की भाजप म्हणजे काशीचा घाट झाला आहे. कितीही पापी माणूस तिथे गेला तरी शुद्ध होतो. वयाच्या ८० व्या वर्षीही साहेबांना जनतेची चिंता आहे. ज्यांनी सर्व दिले ते या वयात साहेबांना सोडून गेले. इतिहासात छत्रपतींच्या घराण्यात फुट पाडण्याचे काम अनाजी पंतांनी केले याची नोंद आहे.

छत्रपतींच्या घरात फुट पाडणार्‍यांचे पुढील २५ वर्ष सत्ता येता कामा नये. ज्यांनी छत्रपतींचे स्मारक उभारले नाही हा आपला अपमान नाही का? याचा बदला घेण्याची वेळ विधानसभेत येणार आहे ती संधी सोडू नका, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. ७२ हजार नोकऱ्यांसाठी मेगाभरती करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? तर अहो तुम्ही तर आपल्या पक्षातच मेगाभरती सुरू केली आहे, असा टोला लगावला.

  • खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, पाच वर्षे कामे केली असती तर तुम्हाला यात्रा काढावी लागली नसती, असा टोला डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला. छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी शिवरायांचे केवळ नावही संसदेत घेतले नाही, हे दुर्दैव आहे. परंतु खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवरायांचे नाव घेत संसद दणाणून सोडले होते हेही डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले.

शिवसेनेने विमा कंपन्यांना इशारा देऊन आजचा १८ वा दिवस आहे परंतु पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. हे सरकार कोणाच्या भल्यासाठी आहे. मुख्यमंत्र्यांचे नागपूर आज क्राईम कॅपिटल झाले आहे. कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? असा सवाल करतानाच येत्या विधानसभा निवडणुकीत या सगळ्याचा जाब या सरकारला विचारायला सज्ज व्हा, असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

  • साडेतीनशे वर्षापूर्वी अफझलखान स्वराज्यावर चालून आला होता. आता ही उपमा कोणाला दिली नाही. नाहीतर पत्रकार मी उपमा दिली ही ब्रेकींग देतील हे सांगताच सभेत हास्याचा फवारा उडाला. त्यावेळी अफझलखानाने फतवा काढला होता. आमच्यात सामील व्हा नाहीतर घरादारावरुन नांगर फिरवू हा फतवा मिळाल्यावर सरदार बिथरले होते. आताचा याच्याशी योगायोग आहे असे समजू नका अशी उपरोधिक टीका डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे परंतु याचा गैरफायदा घेऊन कोण कारवाई केली तर खपवून घेणार नाही, असा इशाराही डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेचा समारोप रायगड किल्ल्यावर २८ ऑगस्टला होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.