Rajgurunagar News : जि. प., पंचायत समिती निवडणूक तयारीसाठी खेड राष्ट्रवादीची शनिवारी बैठक

एमपीसी न्यूज – आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, विविध सेल आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या प्रतिनिधींची महत्वाची बैठक शनिवारी (दि. 7) राजगुरूनगर मार्केटयार्ड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील  मार्गदर्शन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी दिली.

या बैठकीला खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकार, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास लिंभोरे, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा संध्या जाधव, विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निलेश काळे आदींसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी दुपारी दोन वाजता होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील कोविड महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि अतिवृष्टीतील उपाययोजना याबाबत बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.