Rajgurunagar News : आमदार मोहिते पाटलांची विधिमंडळाच्या तीन समित्यांवर वर्णी; पक्षाकडून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

एमपीसीन्यूज : मंत्रिपद न मिळाल्याने पक्षावर नाराज असलेले खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आमदार मोहिते पाटील यांची विधिमंडळाच्या तीन समित्यांवर वर्णी लागली आहे. अंदाज समिती, मराठी भाषा समिती आणि ग्रंथालय समिती या तीन समित्यांच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

कोरोना संकटामुळे वर्षभर विधीमंडळ समित्यांच्या नेमणूक होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, राज्यातील कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर 5 नोव्हेंबरला राज्य सरकारने विधिमंडळाच्या 24 समित्यांचे प्रमुख तथा अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका केल्या.

यामध्ये खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना तीन समित्यांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. या माध्यमातून त्यांची पक्षावर असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

विधिमंडळाच्या अंदाज समिती, मराठी भाषा समिती आणि ग्रंथालय समिती या तीन समित्यांच्या सदस्यपदी आमदार मोहिते पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि तालुक्यातील जनतेकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, विधिमंडळ समित्यांवर वर्णी लागल्याबद्दल आमदार मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे तसेच खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.