Rajgurunagar News : बळीराजाला जगविण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठवा : विनायक घुमटकर

एमपीसीन्यूज : देशात कोरोनाचे संकट आल्यानंतर कांदा, बटाटा, भाजीपाला आणि फळांना अपेक्षित बाजार भाव मिळाला नाही. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कांद्याला चांगला भाव मिळू लागला असताना अचानक केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. त्यामुळे देशभरातील शेतकरी देशोधडीला लागला. जगाचा पोशिंदा जगविण्यासाठी कांदा निर्यातबंदी तातडीने उठविण्यात यावी, अशी मागणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी केली आहे.

यासंदर्भात घुमटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, कोरोना संकटात शेतमालाचे व्यवहार ठप्प झाले. त्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली. या दुहेरी संकटामुळे कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे.

कोरोना संकटात कांदा बटाटासह भाजीपाला आणि फळबाग यांना भाव मिळाला नाही. सर्वाधिक उत्पादित केल्या जाणाऱ्या कांद्याला आता चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने निर्यातबंदी केली.

यामुळे कांद्यासह शेतमाल सडून त्याचे मोठे नुकसान होत आहे. कांदा निर्यात होऊ लागल्याने कांद्याला वाढीव दर मिळून शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे चित्र होते. मात्र, केंद्र सरकारने त्यावर बंदी घातल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

कांद्याला भाव मिळावा म्हणून खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यामाध्यमातून चाकण येथे नाफेड कांदा खरेदी केंद्राला मंजुरी घेऊन ते सुरु केले. त्यामुळे चाकणला कांद्याला 10 ते 12 रुपये भाव मिळू लागला.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. कालांतराने कांद्याचा भाव दुप्पट झाला.अशा वेळी अचानक केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली. शेतकऱ्यांसाठी हा आत्मघातकी निर्णय ठरला. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविणारे केंद्र सरकारच शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असल्याचा आरोप घुमटकर यांनी केला आहे.

कांदा दरातील तेजी कायम राहण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कांद्याची आयात करू नये, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.