Rajgurunagar News : मराठा आरक्षणाचा हक्क नाकारण्यामागे केंद्र सरकार- आमदार दिलीप मोहिते पाटील

आरक्षणासाठी आमदार सोडू

एमपीसीन्यूज : दिलीप मोहिते हा मराठा क्रांती मोर्चाचा माणूस असून मराठा समाजाबरोबर कायम राहणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आमदारकी सोडू, अशी निःसंदिग्ध ग्वाही खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिली. मराठा समाजाचा आरक्षणाचा हक्क नाकारण्यामागे   केंद्रातील मोदी सरकार आहे. मराठा आरक्षणास स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी केंद्र सरकारनेच ही गोष्ट घडवून आणल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.

खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आरक्षणासाठी आज, शुक्रवारी आमदार मोहिते यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन केले.   आंदोलकांनी मोहिते यांना निवेदन देत आरक्षणासाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी केली. त्यावेळी आमदार मोहिते पाटील यांनी आपण आंदोलकांसोबत असून मराठा आरक्षणासाठी वेळ पडल्यास आमदारकी सोडण्याची तयारी दर्शविली. तसेच राज्यातील सर्व खासदार-आमदार मराठा समाजाबरोबर असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्रात कलह निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्याची शिकार करायची आहे.

राज्याचे ऍडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांनी मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयासमोर मांडू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, असे कुंभकोणी यांनी स्वतःच सांगितले असल्याचा गौप्यस्फोट आमदार मोहिते पाटील यांनी केला.

मराठा समाजाचा आरक्षणाचा हक्क नाकारण्यामागे  केंद्रातील मोदी सरकार  आहे. आरक्षणास स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी  ही गोष्ट केंद्र सरकारने घडवून आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी  हुकूमशहासारखा कारभार करतात.

उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला पाहिजे तसे निकाल देण्यासाठी ते आग्रही असतात. एखादा न्यायमूर्ती तसा निकाल देण्यास तयार नसल्यास त्याची अवस्था न्यायमूर्ती लोयांसारखी होते, अशी टीकाही आमदार मोहिते यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.