Rajya Natya Sparda : राज्य नाट्य स्पर्धा 15 दिवस पुढे ढकलली, प्रवेशिका सादर करण्यास 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – 1 जानेवारी, 222 पासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा 15 दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता राज्य नाट्य व बालनाट्य स्पर्धा 15 जानेवारीपासून सुरू होईल. तसेच, प्रवेशिका दाखल करण्यासाठी देखील मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार स्पर्धेकांना 15 डिसेंबर पर्यंत प्रवेशिका सादर करता येतील.

अनेक रंगकर्मींनी आणि संस्थांनी प्रवेशिका दाखल करण्याची व सादरीकरणाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी प्रवेशिका भरण्याची मुदत सुद्धा 30 नोव्हेंबर होती तर, 1 जानेवारी पासून स्पर्धेला सुरूवात होणार होती. अखेर या दोन्ही गोष्टींना मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाटकांची तालीम व प्रयोग सादरीकरण करताना कोविड विषयक नियमांचे पालन अनिवार्य असेल, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. स्पर्धक हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी प्रवेशिका व नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर उपलब्ध होतील, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.