Rakhi for Soldier : डॉ. नंदकिशोर एकबोटे यांच्या पुढाकाराने पुण्याहून सीमेवरील जवानांसाठी 46 हजार राख्या रवाना

एमपीसी न्यूज : शिवाजीनगर (Rakhi for Soldier) पुणे येथील भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेच्या वतीने डॉ.नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांनी सीमेवरील जवानांसाठी सुमारे 46 हजार राख्या नुकत्याच पाठवल्या.

आपण चीन आणि पाकिस्तान सारख्या देशाच्या शेजारी असून सुद्धा सुरक्षित आहोत, आनंदाने आपले कौटुंबिक जीवन जगत आहोत. याचे कारण आपले सैनिक हातात शस्त्र घेऊन आपल्या संरक्षणासाठी सीमेवर सज्ज आहेत. याच कृतज्ञतेतून भारतातल्या प्रत्येक भगिनीने या सैनिकांचा सन्मान आणि आदर राखण्यासाठी बंधुत्वाचे प्रतीक असलेल्या राख्या पाठवण्याचे आवाहन एकबोटे यांनी केले होते. याला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड, पुणे, अकोला, विदर्भ, मुंबई अशा अनेक शहरातून हजारोंच्या संख्येने राख्या जमा झाल्या.

शाळेकरी मुले, मुली, गृहिणी महिला यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी राख्याबरोबर अनेक पत्रे देखील सैनिकांना पाठवली आहेत. विशेषतः राखी बरोबर ती राखी पाठवणाऱ्याचा फोन नंबर दिल्याने अनेकांना प्रत्येक वर्षी सैनिकांचे फोन येत असल्याचा अनुभव आहे. या उपक्रमात शिवाजीनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्थेने एकूण 10,700 राख्या या संस्थेकडे दिल्या. तर, समस्त हिंदू आघाडीच्या, मातृशक्ती संघटनेने 4 हजार राख्या संकलित केल्या.

या कार्यात मॉडर्न हायस्कूलचे शिवाजी अंबिके तर बापूसाहेब पवार कन्या विद्यालयातील तृप्ती निघोजकर यांनीही मोठया संख्येने राख्या संकलित केल्या. यावेळी सीमेवरील सैनिकांबरोबर हवाईदल, नौदल यांना देखील राख्या पाठविण्यात आल्या आहेत. पुण्याहून पाच महारेजीमेंटकडे पोस्टाने या राख्या पाठवण्यात आल्या.

सुरुवातीला 2011 साली 500 राख्या जमा (Rakhi for Soldier) झाल्या होत्या. आज 46 हजारापेक्षा अधिक राख्या जमा झाल्याने विशेष आनंद होत असल्याचे नंदकिशोर एकबोटे यांनी सांगितले. कारगिल येथे 2011 साली गेलो असता वीर जवान सौरभ कालिया यांच्या बलिदानापासून, सैनिकांना राख्या पाठवण्याची प्रेरणा मिळाल्याचे नंदकिशोर एकबोटे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी समृद्धी एकबोटे, डॉ.वैष्णवी एकबोटे, डॉ.ऋग्वेदी एकबोटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Pcmc News: क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कर आकारणीचे अधिकार काढले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.