Ralegansiddhi News : मानवसेवेतून मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा – अण्णा हजारे

एमपीसी न्यूज – गाव, समाज आणि देश यासाठी जगणारी आणि मरणारी माणसे खऱ्या अर्थाने जगतात. त्याचप्रमाणे मानवसेवेतून मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा असतो. असे विचार ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे (गुरुवार, दि.18) रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड विभाग) आयोजित ‘श्यामची आई कृतज्ञता सोहळ्या’च्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.

महाराष्ट्रातील प्रथितयश कवी भरत दौंडकर यांना ‘श्याम’ आणि त्यांच्या मातोश्री कलाबाई दौंडकर यांना ‘श्यामची आई’ सन्मान अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नारायण सुर्वे साहित्य-कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष उद्योजक रंगनाथ गोडगे पाटील होते.

अण्णा हजारे पुढे म्हणाले की, संस्कार केंद्रांपेक्षाही मुलांवर खरे संस्कार आईकडून होतात; कारण आई आपल्या प्रत्येक कृतीतून मुलांना शिकवत असते. आचारशुद्धता, विचारशुद्धता, त्याग, सहनशीलता आणि सामाजिक बांधिलकी ही मानवी जीवनाची पंचसूत्री असावी. प्रपंच सर्वच करतात; पण देशाचा प्रपंच करायला शिका; कारण प्रपंच जेवढा मोठा तेवढा जीवनातील आनंद मोठा असतो.

याप्रसंगी राजुरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जी.के. औटी यांना सानेगुरुजी विचारसाधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘कृष्णाकाठ’ दिवाळी अंक पारितोषिकासाठी महाराष्ट्रातील विविध दिवाळी अंकांमधून पाच दिवाळी अंकांची निवड करून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद – अहमदनगरचा ‘वारसा’ (प्रथम क्रमांक), सकाळ – पिंपरीचिंचवडचा ‘शब्दचैतन्य’ (द्वितीय क्रमांक), सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील ‘शब्दशिवार’ (तृतीय क्रमांक) आणि मराठवाड्यातील नांदेडचा ‘उद्याचा मराठवाडा’ तसेच मुंबईतील वसई येथल्या ‘अधोरेखित’ या दिवाळी अंकांनी (उत्तेजनार्थ) पारितोषिके पटकावली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सन 2015 आणि 2017 च्या सुमारे एकवीस गुणवंत कामगारांना सन्मानित करण्यात आले तसेच, स्वानंद राजपाठक यांचा कोरोनायोद्धा म्हणून विशेष सन्मान करण्यात आला. पतीच्या अकाली निधनानंतर दगडाच्या खाणीत कष्ट करून आपल्या चार अपत्यांचे संगोपन करणाऱ्या ‘श्यामची आई’ सन्मान प्राप्त कलाबाई दौंडकर यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या; तर भरत दौंडकर यांनी सत्काराला उत्तर देताना, याची देही, याची डोळा आईचा सन्मान पाहण्याचे भाग्य लाभले. खरं म्हणजे आईची कविता लिहिता येत नाही; परंतु आईमुळे जीवनात बारा हत्तींचे बळ मिळाले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या सोहळ्यात कवी अनिल दीक्षित, हृदयमानव अशोक आणि सुमीत गुणवंत या कवींनी सादर केलेल्या ‘आई’ या विषयावरील आशयगर्भ कविता ऐकताना अण्णा हजारे यांच्यासह सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकाश घोरपडे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या वेषात अण्णा हजारे यांच्या समवेत सभागृहात प्रवेश करताच उपस्थित रसिकांनी जागेवर उभे राहून उत्स्फूर्त मानवंदना दिली.

श्रमश्री पुरस्कार विजेते बाजीराव सातपुते यांनी ‘आईच्या संस्कारातून घडलेले सानेगुरुजी’ या छोटेखानी व्याख्यानातून सानेगुरुजी आणि श्यामची आई यांच्यातील उत्कट अनुबंधाचे विवेचन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाच्या संयोजनात राजेंद्र वाघ, सुरेश कंक, अरुण इंगळे, मुकुंद आवटे, जयवंत भोसले, इंद्रजित पाटोळे, प्रदीप गांधलीकर यांनी परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.