Ralegansiddhi : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती उत्तम; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज- देशभरात महिलांवर सातत्याने होणारे अत्याचार व गुन्हेगारांना शिक्षेची अंमलबजावणी करण्यात होत असलेला विलंब याच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आत्मक्लेश म्हणून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात मौन व्रत सुरू केले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत वेगवेगळे चुकीचे संदेश सोशल मीडियावर पसरत असून या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन अण्णा हजारे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, देशभरात महिलांवर सातत्याने होणारे अत्याचार व गुन्हेगारांना शिक्षेची अंमलबजावणी करण्यात होत असलेली अंमलबजावणी याच्या निषेधार्थ आत्मक्लेश म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात मौन व्रत सुरू आहे.

काही समाजकंटक व विकृत विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक अण्णांच्या प्रकृतिविषयी व इतर प्रकारे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खोट्या बातम्या पसरवीत आहेत. न्यूज चॅनलचे टीव्ही स्क्रिन एडीट करून काही अशुभ बातम्या पसरविण्यापर्यंत अशा प्रवृत्तींची मजल गेलेली आहे. यासाठी सोशल मीडियाचा सर्रास गैरवापर सुरू आहे.

त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मा. अण्णांच्या कार्यालयाकडे वेगवेगळ्या अफवांविषयी खात्री करून घेणारे असंख्य फोन येत आहेत. अण्णांची प्रकृती नेहमीप्रमाणे सामान्य व स्थिर आहे. त्यांना कोणताही त्रास नाही. दिवसभर अनेक कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी भेटायला येतात. मौन असल्यामुळे अण्णा त्यांच्याशी लेखी संवाद साधत आहेत. अण्णांच्या प्रकृतिविषयी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही.

तरी सर्व कार्यकर्ते, नागरिक व पत्रकार बंधूंनी अशा अफवांवर व खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.