Pune News : जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सूडबुद्धीने केली जात असल्याचा राम शिंदे यांचा आरोप 

एमपीसी न्यूज – लोकांच्या सहभागातून आणि श्रमदानातून जलयुक्त शिवार योजना सुरु झाली, मागील अनेक वर्षांचा इतिहास पाहता ही योजना आतापर्यंतची सर्वात यशस्वी योजना ठरली आहे. परंतु राज्य सरकारकडून मात्र अशा यशस्वी ठरलेल्या योजनेची चौकशी सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप करत माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, गत राज्यसरकारच्या काळात जलयुक्त शिवार अभियान सर्वात यशस्वी झाले. त्यावेळी या संदर्भात सर्व निर्णय घेताना आमच्या सोबत शिवसेना सत्तेत होती. तेव्हा त्यांनी कोणत्याही निर्णयाला विरोध केला नाही. त्यामुळे आता चौकशी करण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेची संशयास्पद भूमिका असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. या चौकशीतून काही निष्पन्न होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

राम शिंदे म्हणाले, या योजनेसाठी सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन साडे सहाशे कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभा केला होता. हे ही योजना यशस्वी करण्याचं महत्त्वाचं कारण आहे, त्यामुळे राज्य सरकार करणार असलेल्या चौकशीमधून काहीही निष्पन्न होणार नाही. कॅगच्या अहवालात कुठेही भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला नाही. त्यामध्ये मार्गदर्शपर सूचना केलेल्या आहेत. या कामाची देखभाल कशी करावी यासंबंधीच्या सूचना या अहवालात केलेल्या आहेत. आणि या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याचे सोडून सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.

लोकशाहीमध्ये सरकारला हे अधिकार आहेत. परंतु या सर्व प्रकारांमध्ये शिवसेनेची भूमिका ही संशय निर्माण करणारी आहे. शिवसेना त्यावेळी देखील सत्तेत सहभागी होती आणि आता देखील आहे. तेव्हा त्यांनी या प्रकरणी आवाज का उठवला नाही ? यावर आताच का बोलतात ? त्यामुळे सरकारने लावलेली ही चौकशी सूडबुद्धीने आणि आकसापोटी लावलेली आहे. सरकारचा हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.