महिला सांघिक स्तोत्र पठण स्पर्धेत ‘राम तांडव’ स्तोत्र प्रथम

एमपीसी न्यूज – क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती (चिंचवड)च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महिला सांघिक स्तोत्रपठण स्पर्धेत ‘रामतांडव’ या स्तोत्राच्या सांघिक सादरीकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. या संघाला रोख पाच हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि प्रशस्तिपत्रक प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.

हा कार्यक्रम निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन शनिवारी (दि.24) पार पडला.

यावेळी विधानपरिषद आमदार उमा खापरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सदस्य आसाराम कसबे, डॉ. नीता मोहिते, महिला विभागप्रमुख सुनीता शिंदे यांच्यासह नटराज जगताप, वर्षा जाधव, अश्विनी बाविस्कर, वासंती तिकोने, आशा हुले आणि अतुल आडे आदी उपस्थित होते.

Tourism week : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडाळातर्फे पर्यटन सप्ताहाचे आयोजन

अखंड भारतमाता, क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि सरस्वतीस्तवन करून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला.संस्कृत, मराठी आणि हिंदी यापैकी एका भाषेची निवड करून अठरा वर्षांच्या वरील महिलांसाठी सांघिक स्तोत्रपठण स्पर्धेत एका संघात किमान बारा आणि कमाल पंधरा स्पर्धकांचा सहभाग हे स्पर्धेचे निकष होते. सुमारे सोळा संघांच्या माध्यमातून एकूण 290 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.

यामध्ये प्रथम क्रमांक – रामतांडव (बक्षिस 5 हजार रुपये) द्वितीय क्रमांक – व्यंकटेश सुप्रभातम् (बक्षिस 4 हजार रुपये),तृतीय क्रमांक – महिषासुरमर्दिनी (बक्षिस 3 हजार रुपये),उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक –  कनकधारा,उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक – शिवतांडव,उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक  विष्णुसहस्त्रनाम  (प्रत्येकी बक्षिस 2 हजार रुपये)

सर्व विजेत्या संघांना प्रशस्तिपत्रक आणि स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

आमदार उमा खापरे उद्घाटन प्रसंगी म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीचे संचित असे जपून ठेवले तर पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाचे भय वाटणार नाही!” असे विचार मांडले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती महिला विभागप्रमुख सुनीता शिंदे यांनी प्रास्ताविकातून स्पर्धेची माहिती दिली; तर डॉ. नीता मोहिते यांनी आपल्या मनोगतातून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने आपल्या चार विभागांच्या माध्यमातून पन्नास वर्षांच्या कालावधीत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.. एकाच रंगसंगतीची पारंपरिक वेषभूषा परिधान केलेले संघ, शंख-टाळ-डमरू अशा पूरक वाद्यांचा वापर, सुस्पष्ट नादमयी शब्दोच्चार, कोणत्याही स्तोत्राची न झालेली पुनरावृत्ती अशा ठळक वैशिष्ट्यांमुळे स्पर्धा कमालीची रंगतदार अन् अटीतटीची झाली. नरेंद्र कुलकर्णी, अरुंधती देशमुख, भारती कुलकर्णी आणि सोपान गोंटला यांनी परीक्षण केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती सदस्य, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. योगिश्वरी महाजन यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली शिंदे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.