Ramadan Eid News : भुकेलेल्यांना शिरखुर्मा वाटप वाटून रमजान ईद साजरी

एमपीसीन्यूज : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन कालावधीत गोरगरीब, बेघर आणि भुकेलेल्यांना शिरखुर्मा वाटप करून अशरफ आत्तार मित्र परिवाराच्यावतीने रमजान ईद साजरी करण्यात आली. लॉकडाउनमुळे भिक्षा मिळणे अवघड झाले असताना ईदनिमित्त बदामाचा शिरखुर्मा मिळाल्याने भिक्षेकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लॉकडाउनमुळे यंदा गरिबांचे जगणे असह्य झाले आहे. या संकटातच रमजानचा महिना आणि मुस्लिम बांधवांचे रोजे पार पडले. गोरगरीब मुस्लिम बांधवांची ईद गोड व्हावी, या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते अशरफ आत्तार यांनी शिरखुर्मा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. जवळपास शंबर नागरिकांना शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले.

पोलीस, रिक्षा चालक यांनाही शिरखुर्मा वाटप करण्यात आला. विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे भिक्षा मिळणे अवघड झाल्याने देहूरोड शहरातील उड्डाणपुलाखाली व इतरत्र वास्तव्य करणाऱ्या बेघर आणि भिक्षेकऱ्यांनाही आत्तार यांनी शिरखुर्म्याची पाकिटे पोहोच केली. या भुकेलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खऱ्या अर्थाने रमजान ईद गोड झाल्याची भावना अशरफ आत्तार यांनी व्यक्त केली.

यावेळी रिपाइंचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष इंद्रपालसिंग रत्तू, नवभारतीय शिववाहतूक आघाडीचे अब्बास शेख, माजी उपसरपंच दुलय्या स्वामी धनगर, फरहद आत्तार, जावेद शेख, जस्सविदंर रत्तू , कैलास करमारे, अमर केजंळे, तय्यब सय्यद, विनोद कर्डीले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.