Pune : रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त  डॉ. भरत वाटवानी यांचा आमटे  दाम्पत्याच्या हस्ते सत्कार 

विशेष मुलाखतीव्दारे उलगडणार कार्य

एमपीसी न्यूज – पूना सिटिझन-डॉक्टर्स फोरमतर्फे (पीसीडीएफ) मंगळवार दिनांक 25 सप्टेंबर 2018 रोजी यंदाच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांचा सत्कार आणि विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. 

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते डॉ. भरत वाटवानी यांचा सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अरूण गद्रे भूषविणार आहेत.

यावेळी डॉ. भरत वाटवानी यांच्या 25 वर्षातील प्रेरणादायी कार्याविषयी डॉ. शारदा बापट आणि माध्यम तज्ज्ञ आनंद आगाशे प्रकट मुलाखतीव्दारे संवाद साधणार आहेत. मंगळवार दिनांक 25 सप्टेंबर 2018 रोजी, संध्याकाळी 6.00 (सहा)  वाजता, बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, कोथरूड, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे.

स्किझोफ्रेनिया झाल्यामुळे रस्त्यात विपन्नावस्थेत फिरणाऱ्या जवळपास सात हजार स्त्री-पुरूष  मनोरूग्णांना  डॉ. भरत वाटवानी यांनी रोगमुक्त केले आहे. तसेच या रूग्णांचे त्यांच्या कुटुंबाशी पुनर्मिलन घडवून आणले आहे. या कार्याबद्दल 2018 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने डॉ. भरत वाटवानी यांना सन्मानित करण्यात आले आहे.  गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा परिसरातील माडिया गोंड आदिवासींसाठी करीत असलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्यासाठी डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांना 2008 साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त तीन डॉक्टर प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहेत.  हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून पुणेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पीसीडीएफ अर्थात पूना सिटिझन-डॉक्टर्स फोरमतर्फे कळविण्यात आले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.