Pune : शांततामय सहजीवन हे भारतीय लोकशाहीचे गुणसूत्र – रामराजे नाईक निंबाळकर

एमपीसी न्यूज – भारतीयांनी तिरस्काराच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणालाच प्राधान्य दिले आहे. शांततामय सहजीवन हे भारतीय लोकशाहीचे गुणसूत्र आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, असे मत महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

वक्तृत्वोतेजक सभेच्या सहकार्याने आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजित वसंतव्याख्यानमालेच्या उद्घटानाचे प्रथम पुष्प गुंफतांना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे अध्यक्ष आणि पुणे मनपाचे नगरसेवक रविंद्र माळवदकर आणि साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे कार्याध्यक्ष भाई कात्रे आदी उपस्थित होते. व्याख्यानमालेचे यंदाचे सत्ताविसावे वर्ष आहे.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, भारतीय उपखंडाचा इतिहास पाहिला तर पाकिस्तान, ब्रह्मदेश, बांग्लादेश या भारता शेजारील राष्ट्रांत आजही लोकशाही व्यवस्था पाळमुळे रुजली नाहीत. त्या तुलनेत भारतात लोकशाहीची पाळेमुळे केवळ रुजली नाहीत तर लोकशाही बहरली, फुलली समृद्ध झाल्याचा अनुभव भारतीय नागरिक घेत आहे. या स्थितीपर्यंत पोहोचण्यात राजकीय पक्षांपेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या योगदान अधिक आहे.

रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, लोकशाही मुल्यांवरील सर्वसामान्यांचा असलेल्या विश्वासामुळेच भारतीय लोकशाही आणि लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेषकांचा संशोधनाचा विषय ठरला आहे. भारतीय नागरिकांच्या मनाचा ठाव त्यांना आजवर लागत नाही आहे. निवडणुकी दरम्यान राजकीय पक्षांमध्ये होत असलेली चिखलफेक पाहता ही भारतीय खंडाची शेवटची निवडणूक असल्याचे निष्कर्ष या आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेषकांनी अनेकदा नोंदवले आहे. पंरतू ज्या शांततेच्या वातावरणात लोकशाहीत सत्तेचे परिवर्तन होते की हे विश्लेषक बुचकळ्यात पडतात.

नाना विविध समुदयाचे, जाती-धर्माचे, विचारधारेचे लोक भारतात राहत असतांना देखील भारतीय लोकशाहीतील सत्तांत्तर प्रक्रिया अतिशय शांततेत होते. अनेकदा राजकीय पक्ष चुकले पंरतू सर्वसामान्य नागरिकांनी सांभाळून घेतले. स्वातंत्र्य संग्रामात ज्या नेतृत्वांनी आहूती दिली. बलिदान केले त्यांच्या त्यागावर आणि आहुतीवरच भारतीय लोकशाहीची मुल्ये टिकली असून ती मुल्ये पिढ्यानपिढ्या परावर्तीत होत आहेत.

साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे अध्यक्ष आणि पुणे मनपाचे नगरसेवक रविंद्र माळवदकर यांनी प्रास्ताविक केले तर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरचे कार्याध्यक्ष भाई कात्रे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.