Chinchwad : मॉडर्नमध्ये रंगला श्रावणी शुक्रवार

एमपीसी  न्यूज – पारंपरिक वेशभूषेतील महिला, त्यांनी सादर केलेल्या विविध फुगड्या, तांदूळ सडू खेळ, केरसुणी, जात, अडवळ घुम, होडी, कोंबडा , लाटणं फुगडी, आवळा वेचू , अग अग सुनबाई, नाच ग घुमा, किस बाई किस, अशा पारंपरिक खेळात मुली रममाण झाल्या. निमित्त होते मॉडर्न हायस्कूल आणि साकार मंगळागौर मंडळ बिजलीनगर चिंचवड आयोजित श्रावणी शुक्रवार कार्यक्रमाचे.

यावेळी महिलांनी भारतीय संस्कृतीतील पारंपरिक मंगळागौर खेळ सादर करून मुलींची मने जिंकली. प्रथम सरस्वती देवीचे पूजन करून देवीचा जागर करण्यात आला. झिम्मा, फुगडीच्या विविध खेळातून महिलांची प्रकृती उत्तम राहते. पारंपरिक खेळातील गाण्यातून समाज प्रबोधन करण्यासाठी ‘पाणी वाचवा’ या विषयावर जनजागृती केली.

त्याचबरोबर साकार सख्यांच्या विविध खेळातून संघ प्रवृत्तीचे महत्व, परस्पर मैत्रीभावाचे महत्व विद्यार्थिनींनी समजून घेतले. यावेळी साकार मंगळागौर मंडळाच्या प्रमुख उज्वला सोनार आणि प्रतिभा काटकर यांनी यापुढे आपला सांस्कृतिक वारसा पुढील पिढीला देण्यासाठी, असे कार्यक्रम करणार असल्याचे सांगितले. यावेळी मॉडर्न हायस्कूल पालक संघाच्या उपाध्यक्षा रेखा धामणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख वर्षा पाचारणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना राऊत यांनी तर आभार वर्षा पाचारणे यांनी मानले. या उपक्रमासाठी अमृता गायकवाड, अर्चना उंडे यांनी सहकार्य केले.

या उपक्रमाचे कौतुक प्राचार्य सतीश गवळी, संस्था उपकार्यवाह शरद इनामदार, कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा.ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.