Pune News : ‘तो’ रानगवा पुन्हा जंगलात परतला

एमपीसी न्यूज : पाषाण तलावासमोर आलेला ‘तो’ रानगवा पुन्हा जंगलात परतला. त्याला पुन्हा जंगलात माघारी पाठविण्यासाठी वन विभाग, पोलिस आणि अग्निशमन विभागाने सुमारे 8 ते 10 तास पाहारा दिला. दरम्यान एनडीए आणि एचईएमआरएलचे संरक्षित वनक्षेत्र रानगव्यांचे कॉरीडॉर आहे. त्यामुळे या परिसरात शेकडो गवे पाहीले जातात अशी माहिती वन विभागासह स्थानिक नागरिकांनी दिली. 

पाषाण तलावासमोरील शिवप्रसाद हॉटेलशेजारील एचईएमआरएलच्या जंगलातून तो रानगवा आला होता. अंदाजे 10 वर्षांचा धष्टपुष्ठ रानगवा, त्याचे वजन 800 ते 1000 किलो इतके असावे अशी माहिती वन विभागाकडून प्रसारमाध्यमातून  देण्यात आली.

पुण्याचे मुख्य वनसंरक्षक राहूल पाटील म्हणाले, पाषाण तलावासमोरील एचईएमआरएलच्या संरक्षित भिंतीच्या पलीकडील जंगलात गव्यांचं कॉरिडॉर आहे. पश्चिम घाटाच्या डोंगंररांगाचा हा भाग असल्यामुळे याठिकाणी कोल्हापुरातून आलेल्या रानगव्यांचे वास्तव्य असते. पावसामुळे संरक्षक भिंत तुटल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामधून रानगवे पुणे बंगलोर महामार्गालगतच्या वनक्षेत्रात येत आहेत. परंतु रानगवा मुळात अहिंसक, लाजाळू आणि भित्रा असल्यामुळे त्याचा कुठलाही उपद्रव नाही. परंतु नागरीवस्तीमध्ये येऊ नये यासाठी त्याला बेशुद्ध न करता पुन्हा जंगलात त्याच्या नैसर्गिक अधिवासात माघारी पाठवण्याचा प्रयत्न आम्ही केला.

स्थानिक रहिवासी सखाराम सुतार म्हणाले, दररोज शेकडो रानगवे कुरण चरण्यासाठी आमच्या शेतात आणि कधीकधी अंगणात देखील येतात. आमच्या गुराढोरांसमवेत ते देखील शांतपणे येतात आणि पुन्हा सायंकाळी जंगलात परतात. त्यामुळे त्यात काही विशेष नाही. हा रानगवा रस्ता चुकल्यामुळे नाही तर सदैव याठिकाणी चरत असतो.

तसेच स्थानिक दुकानदार राजू निकाळजे म्हणाले, रानगवे नेहमी लगतच्या जंगलात येत असतात. रानगव्यांचा शेकडोंचा कळप असतो. त्यापैकी हा एक आहे, तुटलेल्या भिंतीतून तो आला असावा. त्याचा नागरिकांना कुठलाही त्रास नसतो. फक्त कोथरूडच्या घटनेमुळे कोणीतरी याचा व्हिडीओ काढल्यामुळे पोलिस, वन विभागाचे अधिकारीस कर्मचारी आले. तो गवा रोज येतो आणि परत जातो.

माजी वन अधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक प्रभाकर कुकडोलकर म्हणाले, कोल्हापूर, चांदोलीच्या जंगलातून शेकडो गव्यांचा कळप पश्चिम घाटातील पर्वतरांगातून भोर, मुळशी, लोणावळ्यापर्यंत  जातात. रानगव्यांचा हा कॉरीडॉर आहे. आपण त्यांच्या नैसर्गिक अधिवासात वास्तव्याला गेलोय ते आपल्या रहिवाशी क्षेत्रात आलेले नाहीत. त्यामुळे वन विभागाकडून संरक्षित केलेल्या वनक्षेत्रातून पुण्यात येण्याचं प्रमाण वाढलं आहे. दुर्दैवाने एक रानगवा मृत्यूमुखी पडला. पुन्हा अशी घटना घडायला नको. आपल्याला त्यांच्यासोबत जगायला शिकले पाहीजे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.