Ranjangaon Crime News : बनावट पदवीच्या आधारे तोतया डॉक्टरने तीन वर्ष चालवले हॉस्पिटल

सहकारी डॉक्टर, रुग्ण आणि शासनाची फसवणूक केल्याचा तोतया डॉक्टरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही शिक्षण न घेता बनावट पदवीच्या आधारे हॉस्पिटल चालवणाऱ्या एका तोतया डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तोतया डॉक्टर तीन वर्षांपासून नगर पुणे रोडवर कोरेगाव येथे मोरया हॉस्पिटल चालवत होता.

मेहमूद फारुख शेख असे तोतया डॉक्टरचे नाव आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. शीतलकुमार राम पाडवी (वय 45, रा. नंदुरबार) यांनी रांजणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेहमूद याचे वैद्यकीय विभागातील कोणत्याही प्रकारचे शिक्षण झालेले नाही. तरीही त्याने पदवीचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. ते दाखवून फिर्यादी डॉ. शीतलकुमार यांना पार्टनरशिपमध्ये हॉस्पिटल चालवू असे आमिष दाखवले. दरम्यान त्याने डॉ. महेश पाटील असे खोटे नाव धारण केले. पुणे-नगर रोडवर कोरेगाव येथे सन 2018 ते 10 एप्रिल 2021 या कालावधीत त्याने फिर्यादी यांच्यासोबत मिळून ‘मोरया हॉस्पिटल’ चालवले.

दरम्यानच्या कालावधीत आरोपीने फिर्यादी यांच्याकडून हॉस्पिटलचे फर्निचर आणि साहित्यासाठी 17 लाख 50 हजार रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. वैद्यकीय शिक्षण झालेले नसताना देखील आरोपीने रुग्णांवर औषधोपचार करून रुगांची, शासनाची आणि फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रांजणगाव पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.