Lonavala : धक्कादायक…चिमुकलीवर स्कूल बसमध्येच चालकाकडून लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – शाळा सुटल्यानंतर स्कूल बसमधून घरी येत असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीवर स्कूल बस चालकाने स्कूल बसमध्येच लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 16) दुपारी तीनच्या सुमारास कार्ला फाटा ते मळवली दरम्यान घडला. 

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्कूल बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कार्ला फाट्याजवळ एका शाळेत शिकत आहे. ती गुरुवारी दुपारी अडीच वाजता शाळा सुटल्यानंतर स्कूल बसमधून घरी जाण्यासाठी निघाली. यावेळी बस चालक तिच्याशेजारी बसला. त्याने आठ वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यावेळी घाबरल्याने चिमुकली काहीही प्रतिकार करू शकली नाही. याचा फायदा घेत बस चालकाने ही बाब कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. सांगितल्यास मी तुला मारेन आणि पुन्हा माझ्या बसमधून शाळेला घेऊन जाणार नसल्याचा दम भरला. घरी आल्यानंतर मुलीने ही बाब घरच्यांना सांगितली.

यावरून बस चालकाविरोधात फिर्याद दिली. बस चालकाविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376 (1) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 3 (इ), 4, 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.