रशियानेही घेतली अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दखल – शिवाजी शेळके

एमपीसी न्यूज – केवळ दीड दिवसाची शाळा शिकूनही अण्णाभाऊ यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाट्य, पोवाडे लिहिले. यातून दीन दलित, मागासलेल्या लोकांच्या जीवनातील दर्शन प्रकट झाले. त्यांच्या साहित्याची दखल रशियासारख्या बलाढ्य देशानेही घेतली आणि आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना अण्णाभाऊंच्या साहित्याची जाणीव करून दिली, असे शिवाजी शेळके यांनी सांगितले.

“अण्णाभाऊ साठे जयंती व क्रांतीदिन” असा एकत्रित कार्यक्रम क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, चिंचवडगाव “क्रांतीतीर्थ” या चापेकरबंधूंच्या वाड्यात घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे प्रसिद्ध उद्योजक अनिल सौदंडे, प्रमुख वक्ते लहुजी साळवे बहुजन क्रांतिसेना परभणी येथील कार्यकर्ते शिवाजी शेळके, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, सहकार्यवाह रविंद्र नामदे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सदस्य गतिरामजी भोईर, अशोक पारखी, आसारामजी कसबे, नितीन बारणे आदी मान्यवर उपस्थित होते.

शेळके यांनी यावेळी अण्णाभाऊंचा जीवनपटच उलगडून सांगितला. त्यांच्या फकीरा या कादंबरीचे कथानक सांगून त्यावेळच्या दलित समाजाच्या परिस्थितीचे वर्णन केले. तसेच अण्णाभाऊ केवळ दीड दिवसाची शाळाच का शिकले याविषयीही शेळके यांनी माहिती दिली. तसेच चापेकर वाड्यात अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होणे हे गौरवास्पदच आहे, असेही शेळके यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसारामजी कसबे यांनी केले. यावेळी क्रांतिवीर चापेकर यांच्या वाड्यात अण्णाभाऊ साठे यांची जयंती कशाप्रकारे सुरू करण्यात आली हे सांगितले. तर क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चापेकर वाड्यात राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी वेगवेगळ्या धर्मातील व जातीजमातीतील व्यक्तींच्या जोड्या पूजेसाठी बसल्या होत्या व पूजेचे पौरोहित्य करण्यासाठी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या विद्यार्थीनी ज्या रामोशी, कैकाडी, पारधी यांसारख्या भटक्या-विमुक्त जातीजमातीतील आहेत यांनी केले. त्यांच्या बरोबर ब्राह्मणही होते. अशाप्रकारे आम्ही समाजाला एक नवीन विचार व आदर्श दिला आहे.
यावेळी प्रसिद्ध उद्योजक अनिल सौदंडे यांनी चापेकर वाड्यास एक मोठी दानपेटी भेट दिली व स्मारक समितीसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे आभार गतिरामजी भोईर यांनी मानले.  सर्वात शेवटी लहुवंदना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन शुभदा साठे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.