Swarsagar Festival : स्वरसागर महोत्सवातील बहारदार संतूरवादन, गायन आणि सतारवादनामुळे रसिक मंत्रमुग्ध

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यंदाच्या 22 व्या स्वरसागर महोत्सवाच्या दुस-या दिवशी पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य निनाद अधिकारी यांचे संतूरवादन सादर झाले. त्यानंतर सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन झाले. पुढील सत्रात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंदगंधर्व म्हणजेच आनंद भाटे यांचे शास्त्रीय गायन झाले. महोत्सवाचा समारोप पद्मश्री उस्ताद शाहिद परवेझखान यांच्या सतार वादनाने झाला.

पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या दोन दिवसीय स्वरसागर महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. यंदा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी आहे. या शुभयोगाचे औचित्य साधून स्वरसागर महोत्सव, आर्य संगीत प्रसारक मंडळ(सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव) यांच्या सांस्कृतिक समन्वयाने पिंपरी चिंचवड येथे झाला.

महोत्सवात दुस-या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात युवा वादक निनाद अधिकारी याच्या संतूरवादनाने झाली. त्याने यावेळी राग ‘पूरियाकल्याण’ सादर केला. आलाप, जोड, झाला वाजवल्यानंतर त्याने रुपकतालात वादन सादर केले. संतूर हे वाद्य कलमच्या साहाय्याने वाजवले जाते. निनादची कलमवरची हुकमत या संपूर्ण वादनात जाणवून आली. या युवा कलाकाराने वादनाचा सखोल विचार केला असल्याचे त्याच्या संपूर्ण वादनात जाणवून आले.

निनादला तबला साथ त्याच्यासारख्याच एका युवा कलाकाराने अत्यंत समर्पकपणे केली. याच महोत्सवात पंडित पद्माकर कुलकर्णी स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या शंतनु देशमुख याने तबला साथ केली. त्यांचे संतूर व तबल्याचे सहवादन रसिकांची दाद घेऊन गेले.

त्यानंतर पंडित सुधाकर चव्हाण यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘पूरियाकल्याण’ सादर केला. ‘आज सो बना कहे ना’ असे विलंबित ख्यालाचे बोल होते. त्यानंतर ‘बहुत दिन बीते’ ही द्रुतलयीतील बंदिश त्यांनी सादर केली. ‘विठ्ठला रे’ या अभंगाने त्यांनी आपल्या मैफलीची सांगता केली. पंडित सुधाकर चव्हाण यांना संवादिनी साथ प्रभाकर पांडव यांनी केली. तसेच तबला साथ नंदकिशोर ढोरे यांनी केली. पखवाजाची साथ गंभीर महाराज यांनी, टाळांची साथ मुरलीधर पंडित यांनी व तानपु-याची साथ अभयसिंह वाघचौरे व संदीप गुरव यांनी केली.

पुढच्या सत्रात बालगंधर्व चित्रपटातील ‘चिन्मया सकल हृदया’ गीतामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आनंदगंधर्व म्हणजे आनंद भाटे यांचे शास्त्रीय गायन झाले.

स्वरभास्कर भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेल्या आनंद भाटे यांनी गुरुंना वंदना म्हणून त्यांचा आवडता राग ‘यमनकल्याण’ सादर केला. ‘अवगुण न किजीए गुनीजन’ असे विलंबित ख्यालाचे बोल होते. त्यानंतर ‘सखी, ऐरी आली पिया बीन’ ही द्रुतलयीतील बंदिश त्यांनी सादर केली. अत्यंत संयत आणि अभ्यासूपणे सादर झालेले त्यांचे हे गायन रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेले.

त्यानंतर त्यांनी भीमसेनजींनी संगीत दिलेले ‘संगीत धन्य ते गायनी कळा’ या नाटकातील ‘बागेश्री’ रागातील ‘दान करी रे गुरु धन अति पावन’ हे नाट्यपद सादर केले.

नंतर ‘तिलंग’ रागातील ‘आता कोठे धावे मन’ हा अभंग, ‘माझे माहेर पंढरी’ हा पंडितजींनी अजरामर केलेला अभंग आणि ‘सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ या कन्नड अभंगाची शृंखला सादर केली. त्यांचे गाणे म्हणजे फक्त गुरुने दिलेले ज्ञान नसून त्यात त्यांचा देखील विचार आहे हे आनंद भाटे यांच्या गायनादरम्यान प्रकर्षाने जाणवले.

त्यांना संवादिनीसाथ राजीव परांजपे यांनी, तबलासाथ रवींद्र यावगल यांनी केली. या दोघांनी देखील भीमसेनजींना अनेक वेळा साथसंगत केली होती. टाळाची साथ शिरीष जोशी यांनी, तानपुरा साथ आशिष रानडे आणि नामदेव शिंदे यांनी केली.

स्वरसागर महोत्सवाचा समारोप पद्मश्री उस्ताद शाहिद परवेझखान यांच्या सतार वादनाने झाला. त्यांनी यावेळी राग ‘जोगेश्वरी’मधील आलाप, जोड, झाला सादर केला. हा राग प्रामुख्याने वाद्यवादनासाठी वापरला जातो. त्यानंतर त्यांनी राग ‘खमाज’ सादर केला. हा राग प्रामुख्याने तार सप्तकात वाजवला किंवा गायला जातो. पण पंडितजींनी मंद्र सप्तकापासून सुरुवात केली.

‘पधारो म्हारे देश’च्या सुरावटींनी त्यांनी आपल्या सुरेल वादनाची सांगता केली. रात्रीच्या शांत वातावरणात पंडितजींनी सादर केलेले सतारीचे सुरेल बोल रसिकांना मंत्रमुग्ध करुन गेले. शाहिदजींना तितकीच समर्पक तबलासाथ मुकेश जाधव यांनी केली. तसेच तानपु-याची साथ सिद्धार्थ गरुड याने केली.

यंदा पूर्णपणे शास्त्रीय गायन आणि वादनाने रंगलेला हा २२ वा स्वरसागर महोत्सव रसिकांना स्वरांची नववर्षाची भेट देऊन गेला.

या स्वरसागर महोत्सव समितीचे मुख्य समन्वयक प्रवीण तुपे यांनी यावेळी स्वत:च्या प्रॉव्हिडंट फंडातून पाच लाखांची देणगी स्वरसागर महोत्सवासाठी जाहीर केली. पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गालिंदे असून सुरेखा कुलकर्णी, स्मिता देशमुख यांनी संयोजन सहकार्य केले. शरयूनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संकेत तुपे आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

स्वरसागर महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सूत्रसंचालक व रंगावली कलाकार सरोज राव यांच्या दुस-या स्मृतीवर्षानिमित्त आठवणी जागवण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा चव्हाण यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.