Pimpri :…अन् रतन टाटांनी उलगडली त्यांची अधुरी प्रेमकहाणी !

एमपीसी न्यूज- लॉस एंजेलिसमध्ये महाविद्यालयीन पदवीधर म्हणून काम करत असताना मी एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो आणि आम्ही दोघांनी लग्न करण्याचे जवळजवळ निश्चित केले होते, मात्र तिच्या पालकांची परवानगी न दिल्याने ते नातं कायमचं दुरावलं, या शब्दांत टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी त्यांची अधुरी प्रेमकहाणी सांगितली. त्यामुळे त्यांच्या आयुष्यभर अविवाहित राहण्यामागील कारणाचाही उलगडा झाला.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या लोकप्रिय फेसबुक पेजशी बोलताना रतन टाटा यांनी आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतरच्या आपल्या आयुष्याविषयी माहिती दिली. त्यांच्या आजीबरोबर मोठे होत, तिने शिकवलेली मूल्ये, कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना प्रेमात पडणं आणि अखेर ते नाते दुरावणं, हा जीवनप्रवास तीन भागांच्या मालिकेतील पहिल्या भागात रतन टाटा यांनी सांगितला आहे.

82 वर्षीय रतन टाटा म्हणाले की, पालकांनी घटस्फोट घेतल्यामुळे त्यांना आणि त्यांच्या भावाला काही कटू प्रसंगांना तोंड द्यावे लागले तरीही त्यांचे बालपण खूप आनंदात गेले. रतन टाटा 10 वर्षांचे असताना त्यांचे पालक नवल आणि सोनी टाटा यांचा घटस्फोट झाला. त्यांचे पालनपोषण आजी नवजबाई टाटा यांनी केले.

ऑनलाइन व्हायरल झालेल्या या फेसबुक पोस्टमध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या आजीने घालून दिलेल्या मूल्यांबद्दल सांगितले. “मला अजूनही आठवतंय, दुसऱ्या महायुद्धानंतर ती मला आणि माझ्या भावाला घेऊन उन्हाळी सुट्टीसाठी लंडनला गेली होती. तिथेच मूल्ये मनावर बिंबवण्यात आली,” ते म्हणाले, “ती आम्हाला सांगायची, ‘हे बोलू नका’ किंवा ‘त्याबद्दल मौन बाळगा’ आणि ‘इतर सर्व गोष्टींपेक्षा सन्मान महत्वाचा’ हे आपल्या मनावर कोरले गेले.”

वडिलांशी झालेले मतभेदही त्यांनी उघड केले. “मला व्हायोलिन वाजवायला शिकायचे होते, माझ्या वडिलांनी पियानोचा आग्रह धरला. मला अमेरिकेत महाविद्यालयात जायचे होते, त्यांनी ब्रिटनचा आग्रह धरला. मला आर्किटेक्ट व्हायचे होते, त्यांनी मी इंजिनिअर व्हावे, असा आग्रह धरला.” अखेरीस आजीने घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे रतन टाटा अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात गेले. मोठमोठी स्थित्यंतरे केली आणि आर्किटेक्चर पदवी मिळवली. ही गोष्ट त्यांच्या वडिलांना अस्वस्थ करणारी होती. त्यामुळे रतन टाटा यांनी लॉस एंजेलिसमध्ये नोकरी स्वीकारली. त्यांनी तिथे दोन वर्षे काम केले.

“तो एक चांगला काळ होता – हवामान सुंदर होते, माझ्याकडे स्वतःची कार होती आणि मला माझे काम आवडले,” असे त्यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले.

रतन टाटा त्याच काळात प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचे जवळजवळ निश्चितही केले होते. तथापि, आजीची तब्येत ठीक नसल्यामुळे रतन टाटा यांनी भारतात परत जाण्याचा निर्णय घेतला. आपली प्रेमिका आपल्यासोबत भारतात येईल, असे त्यांना वाटत होते. “परंतु 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे तिचे पालक तिला कोठेही पाठवू इच्छित नव्हते आणि नाती दुरावली,” असे टाटा म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.