Pimpri: राष्ट्रीय आपत्तीतही ‘होलसेल’वाल्यांकडून लूट; किराणा साहित्याचे दर वाढविले

 सामाजिक बांधिलकीची जाण नसलेल्यांकडून 'उखळ पांढरे'

एमपीसी न्यूज – जगभरात हाहा:कार माजविलेल्या कोरोनाने भारतात प्रवेश केल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ जाहीर केला; मात्र नेमकी हीच ‘संधी’ साधत किराणा साहित्याच्या होलसेल व्यापा-यांनी किराणा मालाचे दर प्रचंड वाढविले. परिणामी, नाईलाईजाने किरकोळ विक्री करणा-यांनीही हे दर चढेच ठेवले. त्याचा फटका गोरगरिब, सर्वसामान्य, मध्यवर्गीय कुटुबियांना बसला. तर, मोलमजुरी करणारे, हातावर पोट असणा-यांचे जगणे मुश्किल झाले आहे. जीवनावश्यक असलेले तेल, डाळ, शेंगदाण्याचे दर 10 ते 15 रुपयांनी वाढविले आहेत. दाळ, शेंगदाणे 115 ते 120 रुपये किलोला मिळेत असेल तर आम्ही खायचे काय ?, असा सवाल गोरगरिबांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय आपत्तीचा गैरफायदा घेणाऱ्या होलसेल व्यापा-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने भारतात देखील शिरकाव केला आहे. भारतात एक हजाराच्यावर कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी (दि.22) जनता कर्फ्यू होता. कोरोनबाधितांची वाढती संख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि.24) देशभरात 21 दिवसांचा ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. त्यामुळे सर्व व्यापार ठप्प झाले असून, नागरिक घरी बसून आहेत. व्यावसाय बंद आहे. हाताला रोजगार नाही, रोजगार नसल्याने पैसा नाही. त्यातच जीवनावश्यक वस्तुंचे भाव भरमसाठ वाढल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.

लॉकडाऊन जाहीर होताच नागरिकांनी रात्रीतच किराणा साहित्याच्या खरेदीसाठी दुकानासमोर गर्दी केली. या आपत्तीतही नेहमीप्रमाणे काही होलसेल व्यापा-यांनी याचा गैरफायदा घेतला. स्टॉक असतानाही किराणा मालाचे प्रचंड दर वाढविले. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनीही दर चढेच ठेवले. परंतु, दुसरा पर्याय नसल्याने नागरिकांनी चढ्या दराने खरेदी केली. यामध्ये सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री लागली आहे. आपत्तीच्या काळात सर्वजण सामाजिक बांधिलीकी जपत असताना किराणा मालाच्या होलसेल व्यापा-यांनी मात्र आपले ‘उखळ पांढरे ‘ करण्यातच धन्यता मानली.

दुकानदारांनी आपत्तीचा फायदा घेऊ नये, चढ्या दराने मालाची विक्री करु नये, असे सरकारचे आदेश असताना त्याला होलसेल विक्रेत्यांनी हरताळ फासला. पिंपरी कॅम्पातील होलसेल विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात किराणा साहित्याचे दर वाढविले आहेत. आपत्तीतही त्यांच्याकडून उकळ पांढरे केले जात असून, हे म्हणजे ‘मड्यावरच्या टाळूवरचा लोणी खाण्याचा’ प्रकार असल्याचा संताप सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. अशा होलसेल विक्रेत्यांवर कारवाईची मागणी जोर धरु लागली आहे.

यापुर्वी 100 रुपये किलोत मिळणारी मूगडाळ आता 115 रुपये किलो मिळत आहेत. 105 रुपयांना मिळणारे शेंगदाणे 115 रुपये झाले आहेत. तब्बल 10 ते 15 रुपयांनी किमती वाढविल्या आहेत. तर, तेलाच्या किमतीतही पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे.

सिगारेट, तंबाखु भिडली गगनाला !

सिगारेट, तंबाखूचे दर सर्वात महाग झाले आहेत. 11 रुपयांना मिळणारी तंबाखुची पुडी तब्बल 20 रुपयांना मिळत आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी तंबाखु ठेवणे बंद केले आहे. तर, बंदी असलेला गुटख्याची किराणा दिकानातून चोरुन चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.

 “ज्यांच्याकडे स्टॉक आहे. अशा होलसेल विक्रेत्यांनी भाव वाढवले आहेत. त्यामुळे किरकोळ दुकानातही किराणा मालांचे भाव वाढलेले आहेत. कडधान्य, डाळी, तेल यांचे भाव वाढले आहेत. मात्र, कंपनीकडून भाव वाढवलेले नाहीत. ग्राहक किरकोळ दुकानदारांकडे तक्रार करतात. पण, आम्ही कुणाकडे तक्रार करायची हा प्रश्न आहे. होलसेल विक्रेत्यांकडे तक्रार, अथवा विचारणा केली असता त्यांच्याकडून सरळ माल नसल्याचे सांगण्यात येते. यामध्ये किराणा मालाच्या किरकोळ विक्रेत्यांचे दोन्ही बाजूने हाल होत आहेत. आम्ही चढ्या भावाने विक्री करत नाही. पण आम्हाला ज्या भावाने मिळेल, किमान त्या भावाने विक्री करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. सध्या प्रशासनासोबत किराणा दुकानदार देखील तारेवरची कसरत करीत आहेत”. मनोज पानसरे :  किराणा दुकानदार.

 

 ”आपत्तीचा काळ आहे. साहित्याचा काळाबार करु नये, अशा सूचना दुकानदारांना दिल्या आहेत. पण, परिस्थितीचा फायदा घेणारी काही प्रवृत्ती असते, ती आपण बदलू शकत नाही. गहू, तांदूळ परराज्यातून येत आहे. जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक चालू आहे. पण, चालक, हमाल मिळत नाही. वाहतुकीसाठी भाडे जास्त मागितले जात आहे. त्यामुळे माल उपलब्ध होत नाही. पण, मालाची कमतरता देखील नाही. परंतु, नागरिकांनी आवश्यक तेवढेच साहित्य खरेदी करावे. सहकार्य करावे”. गजानन बाबर : माजी खासदार, अध्यक्ष-व्यापारी असोसिएशन.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.