Rathnai news: जादा दराने वैद्यकीय बिल आकारल्याबद्दल फिनिक्‍स रुग्णालयाला पालिकेची नोटीस

महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयामध्ये कोविड-19 या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची येणारी वैद्यकीय खर्चाची बिले ही अवास्तव रकमांची येत आहेत.

एमपीसी न्यूज – रहाटणी येथील फिनिक्‍स रुग्णालयाला करोनाबाधित रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाने निश्‍चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कारणे दाखवा नोटीस बजावल्यापासून 48 तासांत खुलासा करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला कळविले आहे.

महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयामध्ये कोविड-19 या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची येणारी वैद्यकीय खर्चाची बिले ही अवास्तव रकमांची येत आहेत.

यासाठी महाराष्ट्र शासनाने निश्‍चित केलेल्या दरांनुसार बिले असल्याबाबतची तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे.

त्यासाठी सह आयुक्त आयकर विभाग एन.अशोक बाबू यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या समितीने फिनिक्‍स रुग्णालयाला भेट देऊन तपासणी केली.

रुग्णांच्या वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता शासन निश्‍चित दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारणी केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

हॉस्पिटलने ॲडमिनीस्ट्रेशन, बेड चार्जेस, आयपीडी, इसीजी, 2 डी इको, पथोलॉजी चार्जेस, एक्‍स रे चार्जेस शासन निश्‍चित दरांपेक्षा जास्त आकारल्याचे दिसून आले.

तसेच विमा संरक्षित रुग्णाकडून जादा रक्कम घेणे तसेच करोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या शासनाच्या सूचना असताना देखील हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांसाठी एकच प्रवेशद्वार असल्याचे समितीस आढळून आले.

त्याबाबत देखील रुग्णालय प्रशासनाला तातडीने दोन स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत रुग्णालय प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

तसेच शासनाने करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी निश्‍चित केलेले दरपत्रक रुग्णालयामध्ये दर्शनी भागामध्ये लावण्याच्या सूचना दिल्या असताना देखील हॉस्पिटल प्रशासनाने शासनमान्य दरपत्रक दर्शनी भागात लावले नसल्याचे वैद्यकीय समितीला आढळून आले. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला दरपत्रक लावण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.