Chinchwad : मंदोदरीच्या सात्विक सहवासाने रावणाला आत्मज्ञान झाले – गुरुदासी विजयालक्ष्मी शिरगांवकर

एमपीसी न्यूज –   जीवनभर रामाचा व्देष करणारा रावण अंतिम समयी पत्नी मंदोदरी हिच्या शांत, संयमी, शोषित, उदारमतवादी, त्यागी स्वभावामुळे राममय झाला. तामसी, क्रोधी, अनाचारी, रावणाला मंदोदरीच्या सात्विक सहवास व मार्गदर्शनाने आत्मज्ञान झाले. परंतू रामायणामध्ये मंदोदरीवर अन्याय झाला असे दिसते. रणांगणावर रामाच्या हातून रावणाला व राक्षस कुळाला मृत्यू आल्यास त्यांना मुक्ती मिळेल असे नारदमुनींनी रावणाला सांगितले होते. त्यामुळे प्रकांडपंडित विव्दान ज्योतिष, चार वेद व सहा शास्त्र तोंडपाठ असणा-या रावणाने सीतेचे हरण करून रामाशी युद्ध  केले, असे गुरुदासी विजयालक्ष्मी शिरगांवकर यांनी सांगितले.

चिंचवडगावातील गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने आयोजित जिजाऊ व्याख्यानमालेचे हे 28वे वर्ष होते. समारोपाचे पाचवे पुष्प गुंफताना गुरुदासी विजयालक्ष्मी शिरगांवकर यांनी ‘सती मंदोदरी’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी नगरसेवक कैलास बारणे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, प्रभाग स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, सुहास पोफळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे ज्ञानेश्वर खेडकर, हेमा सायकर, शिल्पा वाघुले, सुप्रिया सोळंकुरे, प्रा. तुकाराम पाटील, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

गुरुदासी विजयालक्ष्मी शिरगावकर यांच्या हस्ते प्रज्ञा पिसोळकर (समुपदेशक) यांना जिजाऊ पुरस्कार, हेमंत वसंत  कुंभोजकर (फिजिओथेरेपिस्ट) यांना क्रांतीवीर चापेकर पुरस्कार आणि कस्तुरी कल्लपा जमखंडी (प्रवचनकार) यांना श्री चिंतामणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गुरुदासी शिरगांवकर म्हणाल्या की, संत तुळशीदास आणि वाल्मिक ऋषी यांनी लिहिलेल्या रामायणा व्यतिरिक्त सव्वाशेहून जास्त रामायण कथा उपलब्ध आहेत. रामायणामध्ये मंदोदरीवर अन्याय झाला असे दिसते. तिचा उल्लेख फक्त रावणाची पत्नी एवढाच दिसतो. पण ती रावणाची मार्गदर्शक होती. रावण तिचा वेळोवेळी अपमान करायचा आणि आदरही तेवढाच करायचा.

रावणाचे वडील विश्रवा आणि आई कैकसी हे शंकरभक्त होते. रोज शंकराच्या पिंडीची पूजा करायचे. रावणाने त्यांच्यासाठी बारा वर्ष तप करून साक्षात शंकराकडून शंकराचे चैतन्य व त्याच्या आत्म्याचा अंश असणारे आत्मलिंग आणले होते. मंदोदरी ही शंकराच्या अंगच्या मळापासून तयार केलेली पुतळी होय. तिचा जन्म मयासूर आणि हेमा यांच्या पोटी झाला. तिलादेखील शंकराचा आशीर्वाद प्राप्त झाला होता. रावणाचा स्वभाव माहित असतानाही मंदोदरीने त्यागी वृत्तीच्या स्वभावामुळे राज्याच्या कल्याणासाठी लोकसमर्पण वृत्तीने सर्व स्वार्थ दूर लोटून रावणाशी लग्न करण्यास होकार दिला. रावणाच्या तामसी वृत्तीला पायबंद घालण्यासाठी मंदोदरीचा जन्म झाला असल्याचे नारदमुनींनी तिला आशीर्वाद देताना सांगितले होते. आपल्या सात्विक सहवासाने, सौंदर्याने, पुण्यात्माने रावणामध्ये परिवर्तन घडेल असा मंदोदरीला विश्वास होता. छोट्या अपराधालाही रावण मोठी शिक्षा देतो. मात्र स्तुती पाठकांच्या मेळ्यात बसतो. हे रावणाचे गुण मंदोदरीने हेरले होते.

पृथ्वी मृत्यूलोक आहे, प्रत्येक जीवाला मृत्यू आहे. जिथे योग आहे तिथे वियोग आहे. हे शंकराने मंदोदरीला आशीर्वाद देताना सांगितले होते. छळ कपटाने सीतेचे हरन करून रावणाने रामाला युद्धासाठी उद्युक्त केले. रामाशी लढण्यासाठी युद्धभूमीवर निघताना रावण मंदोदरीला म्हणाला की, ‘सिता ही आदिशक्ती मायेचे रूप आहे, मी तिचे दर्शन घेतले आहे. मी योद्धा आहे, माझा प्राण रणांगणावरच गेला पाहिजे, म्हणून मी रामाबरोबर युद्ध करणार आहे. पण हे युद्ध माझ्यासाठी एक पूजा असेल. ज्यावेळी राम माझ्यावर बाण मारेल त्यावेळी माझे शीर कलम होऊन त्याच्या पायावर पडेल आणि मी अंत:करणापासून त्याच्या चरणाची शिरकलमाव्दारे पूजा करणार आहे’ आणि तसेच घडले. रावणाच्या अंतिम समयी त्याच्या चेह-यावर शिवभक्तीचे तेज होते.

युद्ध भूमीवर मंदोदरीने येऊन रावणाचे कलम झालेले शीर मांडीवर घेतले. अंतिमसमयी रावण मंदोदरीला म्हणाला की, माझ्यातील दुर्गृण संपावे म्हणून तू खूप प्रयत्न केले. परंतू आता मला या अंतिम क्षणी रामाच्या पायावर स्पर्श केल्याने असे भासते की, मी आणि तू एका शिवमंदिरात शिवभक्तीत तल्लीन आहोत, असा संवाद साधून रावणाने प्राण सोडला. या नंतर मंदोदरीने लंकेचा त्याग केला व ती शिवभक्त रावणाबरोबर सती गेली. राक्षसी वृत्तीच्या रावणाला राममय करण्यासाठी मंदोदरीने आपले आयुष्य पणास लावले, असेही शिरगांवकर यांनी सांगितले.

संयोजनात शिल्पा वाघुले, वैशाली खोले, कविता शिंदे, मंजू रत्नपारखी, सुजाता गोलांडे, सुजाता पोफळे, गीतल गोलांडे, चैताली चोपडे, सरीता कुलकर्णी, मंगल नेवाळे, अभिलाषा गोलांडे, मेधा खुळे आदींनी सहभाग घेतला.   प्रास्ताविक राजाभाऊ गोलांडे यांनी केले. स्वागत नगरसेविका करूणा चिंचवडे, तर सूत्रसंचालन वैशाली खोले, आभार शिल्पा वाघुले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.