Ravet : ट्रकवर कार आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणारी स्विफ्टकार समोर जात असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज (रविवारी) देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर रावेत येथील हॉटेल सॅन्टोसा समोर घडला.

निलेश हरिदास साळुंखे (वय 30, रा. नांदेड सिटी, पुणे. मूळ रा. कोंढार चिंचवली, ता. करमाळा, जि. सोलापूर), अभिषेक रवींद्र शर्मा (वय 24, रा. काशीपुर, उत्तराखंड), पराग प्रवीण हेरेगावकर (वय 28, रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर सुरज राजेंद्र मांजरे (वय 27, रा. दत्तनगर कॉलनी, सांगली) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि जखमी सर्वजण एकाच कंपनीत काम करतात. ते त्यांच्या कामानिमित्त शनिवारी (दि. 6) सायंकाळी सात वाजता कारमधून (एम एच 12 / इ एम 9974) बाहेर गेले होते. कुठे जात आहेत, याबाबत त्यांनी घरी सांगितले नाही. रविवारी (दि. 7) देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. रावेत येथील हॉटेल सॅन्टोसा समोर कार आली असता समोर रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रकच्या (जी जे 31 / टी 2614) मागून कार ट्रकखाली गेली.
कारचा वेग जास्त असल्याने पूर्ण कार ट्रकखाली गेली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकजण जखमी झाला असून त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.