Ravet : गॅस एजन्सीची पाऊण कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थान पोलिसांकडून अटक

फसवणुकीचे बिंग फुटताच कामगार गॅस शेगड्या चोरून झाला होता पसार

एमपीसी न्यूज – गॅस एजन्सीमध्ये काम करत (Ravet) असताना दोन कामगारांनी मिळून एजन्सीची तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याबाबत रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा प्रकार 20 फेब्रुवारी 2021 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ओवी भारत गॅस एजन्सी, शिंदे वस्ती, रावेत येथे घडला. या गुन्ह्यातील एक आरोपी फसवणुकीचे बिंग फुटताच मूळ गावी राजस्थान येथे पळून गेला. तब्बल एक वर्षानंतर त्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. शेतातील खोलीत बसलेल्या आरोपीला राजस्थान पोलिसांनी सापळा लावून अटक केली.

श्रवणकुमार मोहनराम मांजु – बिष्णोई (वय 27, मूळ रा. मंडला काला, ता. देचू, जि. जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गॅस एजन्सीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करणारी महिला कर्मचारी आणि गॅस डिलिव्हरी करण्याचे काम करणारा कामगार श्रमणकुमार मोहनराम मांजू यांनी संगनमत करून गॅस एजन्सीची तब्बल पाऊण कोटी रुपयांची फसवणूक केली.

ग्राहकांना नवीन कनेक्शन देणे, रेग्युलेटर देणे, सुरक्षा पाईप लायटरची विक्री केल्याचे पैसे ग्राहकांकडून थेट स्वतःच्या बँक खात्यावर घेऊन हे फसवणूक करण्यात आली आहे. चोरीचे बिंग फुटताच डिलिव्हरी बॉय श्रवण कुमार मोहनराम मांजू त्याच्या मूळ गावी मंडला कला, देचू, जोधपूर, राजस्थान येथे पळून गेला आहे. जाताना त्याने एजन्सीमधून 30 गॅस शेगड्या चोरून नेल्या.

निलेश डोके (वय 45, रा. तानाजी नगर, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महिला कर्मचारी (Ravet) आणि श्रवणकुमार यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 381, 408, 457, 201, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी श्रवणकुमार मोहनराम मांजु हा फिर्यादी यांच्या गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरची डिलिव्हरी देण्याचे काम करत होता. एजन्सीमधील दोन कर्मचारी महिलांना आपल्या कटात सामील करून श्रवणकुमार याच्या मदतीने फिर्यादी यांच्या गॅस एजन्सीच्या ग्राहकांकडून वेगवेगळ्या कारणांसाठी येणारे पैसे स्वतःच्या बँक खात्यावर घेतले.

ते पैसे दोघींनी आपसात वाटून घेतले. याप्रकरणी फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर दुसर्‍या कर्मचारी महिलेने तिच्या वाट्याला आलेले 12 लाख रुपये फिर्यादी यांना रोख स्वरूपात परत केले.

Sudwadi : ग्रामपंचायत भागात अनधिकृत प्लॉटिंगला बंदी घालावी – उपायुक्त रामदास जगताप

पोलिसांनी दोघींचे बँक स्टेटमेंट काढले असता त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संशयित व्यवहारांची चौकशी केली असता दोघींनी श्रवणकुमार याच्या मदतीने लाखो रुपयांची फसवणूक केल्यास उघड झाले. श्रवणकुमार मोहनराम मांजु याच्या वैयक्तिक बँक खात्यावर तब्बल 47 लाख रुपये गैरव्यवहाराची रक्कम जमा झाली आहे. त्यातील एकही रुपया त्याने फिर्यादींना यांना परत दिला नाही.

दरम्यान, आपले फसवणूक प्रकरण उघडकीस येणार असल्याचे समजताच महिला कर्मचाऱ्यांनी दुकानातील हिशोबाचे रजिस्टर जाळून पुरावा नष्ट करून त्या बदली दोघींनी हिशोबाचे नवीन रजिस्टर लिहून दुकानामध्ये ठेवले होते. 28 नोव्हेंबर 2022 रोजी श्रवणकुमार याने 30 स्टेनलेस स्टीलच्या शेगड्या चोरून शहरातून पळ काढला. त्याने 28 सिलेंडरचे पैसेही एजन्सीत जमा केले नव्हते.

आरोपीच्या शोधत रावेत पोलिसांनी राजस्थान गाठले. मात्र रावेत पोलिसांना आरोपी मिळून आला नाही. तरी देखील रावेत पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे,तपासी अधिकारी प्राची तोडकर हे आरोपीच्या मागावर होते.खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक बाबीचे विश्लेषण करून आरोपीची संभाव्य लपण्याच्या ठिकाणांची माहिती रावेत पोलिसांनी राजस्थान येथील स्थानिक पोलिसांसोबत मिळून आरोपीचा माग काढला. सोमवारी (दि. 27 नोव्हेंबर 2023) राजस्थान मधील फलोदी जिल्हा पोलिसांनी आरोपी श्रवणकुमार मोहनराम मांजू याला अटक केली आहे.

राजस्थान येथील फलोदी जिल्हा पोलीस अधीक्षक हनुमान प्रसाद मीना (I.P.S) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी महेन्द्र सिरवी, पोलीस अंमलदार प्रदीप,  सहीराम, हितेश, चौखाराम, गिरीराज, भगवानाराम, महेन्द्र उज्वल यांच्या पथकाने आरोपीस सापळा रचून पकडले. आरोपीचा ताबा घेण्यासाठी रावेत पोलिसांचे पथक जोधपूर येथे रवाना झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.