Ravet : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव -ज्ञानेश्वर लांडगे

अभियांत्रिकीच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी सादर केले 105 प्रकल्प

एमपीसी न्यूज – मानवी जीवन अधिक सुखकर होण्यासाठी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पामुळे त्यांची आकलनक्षमता आणि संशोधनवृत्ती वाढते. तसेच त्यांनी सादर केलेल्या प्रकल्पातून विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे हे दिसते. यामध्ये नदीजोड प्रकल्प, इलेक्ट्रिकवर चालणारी दुचाकी, मानवी स्वभावाचे अवलोकन करणारा स्वयंचलित रोबोट, बायोमॅट्रीकवर चालणारी दुचाकीची संगणकप्रणाली, चहा आणि कॉफीचे ॲटोमॅटीक मशीन, वाहतूक नियंत्रण करण्यासाठी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, अल्पखर्चातील कूलर यंत्रणा, मोबाईल चार्जिंगची अल्प खर्चातील यंत्रणा असे प्रकल्प प्रत्यक्षात वापरल्यास कमी खर्चात जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा लाभ होईल, असे मत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात (पीसीसीओईआर) मध्ये सोमवारी (17 जून) प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग (पीबीएल)चे आणि पीसीसीओईआर युजिकॉनचे आयोजन केले होते.

  • यावेळी पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्‍वस्त भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीष तिवारी, समन्वयक डॉ. राहुल मापारी आदी उपस्थित होते.

यावेळी अभियांत्रिकीच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी 105 प्रकल्प सादर केले. यामध्ये मराठवाड्यातील दुष्काळ निवारणासाठी गोदावरी आणि मांजरा नदीजोड प्रकल्प, त्याचे फायदे व त्यामुळे होणारी हरीत क्रांती तसेच प्रदूषण रोखणारी अल्प खर्चात इलेक्ट्रीकवर चालणारी दुचाकी, शहरी भागातील वाहतुकीवर नियंत्रण मिळविणारी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, मानवी भाव दर्शविणारा रोबोट हे प्रकल्प विशेष आकर्षण ठरले.
स्वागत प्रा. डॉ. हरीश तिवारी, सुत्रसंचालन प्रा. निधी खरे यांनी तर, डॉ. राहुल मापारी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.