Ravet: बंधा-यात मिसळणारे अशुद्ध पाणी, नदी पात्रात जाणारे नाले बंद करा -श्रीरंग बारणे

खासदार बारणे यांनी महापालिका, 'एमपीसीबी'च्या अधिका-यांसह केली नदीपात्राची पाहणी

एमपीसी न्यूज – पुनावळे, रावेत, किवळे परिसरातील नाल्यातील पाणी थेट रावेत बंधारा येथे नदी पात्रात जात असल्याने शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी उपसा केंद्रालगत अशुद्ध पाण्याचा साठा झाल्याने जलपर्णी वाढली आहे. बंधाऱ्यावर कपडे, गाड्या धुतल्या जात असल्याने पिण्यासाठी उपसा करणारे पाणी अशुद्ध होत आहे. नाल्याचे तसेच महापालिकेच्या मैला शुद्धीकरण केंद्रातील अशुध्द पाणी थेट नदी पात्रात जात असल्याने पवना नदीला गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नदी पात्राची अवस्था अतिशय दयनीय झाल्याचा आरोप करत बंधा-यात मिसळणारे अशुद्ध पाणी, नदीपात्रात जाणारे नाले तत्काळ बंद करा, अशा कडक सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका, ‘एमपीसीबी’च्या अधिका-यांना दिल्या आहेत.

शिवसेना खासदार बारणे यांनी आज (गुरुवारी) पिंपरी महापालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांसह मोरया गोसावी मंदीर परिसर ते रावेत बंधारा या भागाची पाहणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवड, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता मकरंद निकम, जल:निस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशीक अधिकारी किरण हसबणीस, उपअभियंता व्ही.एम. मांढरे, आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे उपस्थितीत होते.

_MPC_DIR_MPU_II

खासदार बारणे म्हणाले, महापालिका पवना नदीवरील रावेत बंधा-यातून शहरास पाणी पुरवठा करण्यासाठी दररोज 520 एमएलडी पाणी उचलते. परंतु, महापालिका ज्या ठिकाणाहून पाण्याचा उपसा करते. त्याठिकाणी मैलामिश्रीत पाणी नदीपात्रत जात असल्याने मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली आहे. या जलपर्णीमुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुनावळे, रावेत, किवळे या भागातील नाल्यातील थेट पाणी नदी पात्रात जात असल्याने शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी उपसा केंद्रा लगत अशुद्ध पाण्याचा साठा झाल्याने जलपर्णी वाढली आहे.

त्याच रावेत बंधाऱ्यावर कपडे, गाड्या धुतले जात असल्याने पिण्यासाठी उपसा करणारे पाणी अशुद्ध होत आहे. पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर नाल्याचे तसेच महापालिकेच्या मैला शुद्धीकरण केंद्रातील अशुध्द पाणी थेट मिसळत असल्याने पवना नदीला गटार गंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या निष्काळजी पणामुळे पवना नदी पात्राची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. नदी पात्रात थेट जाणारे नाले बंद करावेत.

नदी लगत असलेले ड्रेनेज चेंबर्स दुरुस्त करावेत. रावेत बंधारा येथे कपडे व गाड्या धुण्यास मज्जाव करावा. नदी पात्रातील व रावेत बंधाऱ्यावरील जलपर्णी तात्काळ काढण्यात यावी, अशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे बारणे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.