Ravet Crime News : अवैध वाळू उपसा करुन विक्रीस आणलेल्या तिघांवर गुन्हा; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – अवैधरित्या वाळू उपसा करुन विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दोन ट्रक आणि वाळू असा एकूण 33 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही करवाई मंगळवारी (दि. 21) सकाळी किवळे गावात करण्यात आली.

संदीप अनिल कोळी (वय 24, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली), सत्यवान गोवर्धन पाटील (वय 35, रा. कुंजीरवाडी, ता हवेली), महादेव शंकर गोडगे (वय अंदाजे 40, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली.) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस हवालदार सुनील शिरसाट यांनी रावेत पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हवेली तालुक्यातील डाळिंब गावच्या ओढ्याच्या पात्रातील वाळूचा उपसा करून ती चोरी केली. महसूल विभागाचा कोणताही परवाना न घेता, पर्यावरणाचा ऱ्हास करून आरोपींनी बेकायदेशीरपणे वाळू किवळे गावात विक्रीसाठी आणली. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून दोन ट्रक आणि त्यातील दहा ब्रास वाळू असा एकूण 33 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ट्रक चालक संदीप आणि सत्यवान या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह ट्रकचा मालक महादेव याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.