Ravet Crime News : बनावट कागदपत्रांच्या आधारे भागीदारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रे तयार करून ती दुय्यम निबंधक भागीदारी संस्थेच्या कार्यालयात सादर करून कंपनीच्या भागीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित भागीदारांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला आहे.

गिरीधर अंकुशराव गायकवाड यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्तांकडे लेखी अर्ज केला आहे. त्यानुसार विजय वामन येळवंडे या भागीदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गायकवाड यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे कि, तक्रारदार गायकवाड आणि विजय येळवंडे यांची कामानिमित्त ओळख झाली. त्यानंतर सन 2014 मध्ये त्यांनी कमलेश बठीजा, सागर परमाने आणि विजय येळवंडे यांनी मिळून मे. गोधन प्रॉपर्टीज नावाने भागीदारी संस्था सुरु केली.

संस्थेची अधिकृत नोंदणी करून सर्वांनी समसमान गुंतवणूक केली. या भागीदारी संस्थेचे बँक खाते चिंचवडगाव येथील विश्वेश्वर बँकेत सुरु केले. त्यानंतर भागीदारी मध्ये रावेत येथील एक मिळकत विकसित करण्यास सुरु केली. सर्वानुमते बँकेचे सर्व व्यवहार पाहण्याचे अधिकार येळवंडे यांना देण्यात आले. त्यांनी त्याचा गैरफायदा घेऊन भागीदारी फर्मचे आलेले लाखो रुपये बँक खात्यातून काढून भागीदारांना न देता वैयक्तिक कारणासाठी वापरले. येळवंडे यांनी 32 लाख रुपये एवढी रक्कम काढून घेतली.

याबाबत येळवंडे यांना विचारले असता त्यांनी तात्पुरती उत्तरे देऊन भागीदारांच्या सह्या घेऊन संस्थेतून बाहेर पडले असे दाखवण्यासाठी खोटे दस्तावेज मोहननगर चिंचवड येथे करून घेतले. त्यावर तक्रारदार गायकवाड, कमलेश बठीजा आणि सागर परमाने यांचे फोटो चिकटवून त्यांच्या परस्पर साजीद इब्राहिम वारेकर यांना भागीदार म्हणून घेतले.

येळवंडे यांनी बनावट दस्त दुय्यम निबंधक कार्यालय बिबवेवाडी येथे जमा केले. तक्रारदार आणि त्यांचे इतर दोन भागीदार संस्थेतून निवृत्त झाल्याचे दाखवून तीन भागीदार आणि शासनाची फसवणूक केली. त्यानंतर तिघा भागीदारांना एका हॉटेल मध्ये बोलावून येळवंडे यांनी दमदाटी केली असल्याचेही तक्रार अर्जात म्हटले आहे.

याप्रकरणी विजय येळवंडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून योग्य शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.