Ravet Crime News : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज – रावेत परिसरात एका महिलेचा मृतदेह तिच्या घरात संशयास्पदरित्या आढळून आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पतीने खून केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास जाधववस्ती, रावेत येथे उघडकीस आली.

खैरून बी उर्फ मुन्नी हैदर नदाफ (वय 38, रा. जाधव,वस्ती, रावेत) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मलिक शेंकुबर नदाफ (वय 39, रा. अक्कलकोट एमआयडीसी, सोलापूर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हैदर साहेबलाल नदाफ (रा. लोणी स्टेशन, पुणे. मूळ रा. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत खैरून बी हैदर नदाफ यांचे मावशीचा मुलगा आरोपी हैदर याच्यासोबत सन 2002 मध्ये लग्न झाले. सुरुवातीला खैरून बी आणि हैदर हे दांपत्य लोणी काळभोर येथे वास्तव्यास होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. हैदर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता. पतीसोबत भांडण झाल्याने खैरून बी आठ दिवसांपूर्वी मुलांना घेऊन जाधववस्ती येथे राहण्यास आल्या.

याबाबत हैदर याने खैरून बी यांचा भाऊ फिर्यादी मलिक यांना फोन करून सांगितले होते. ‘खैरून बी रागाच्या भरात गेली असेल. 10-15 दिवसात ती परत येईल. वाट बघा’ अशी मलिक यांनी हैदरची समजूत काढली होती.

रावेत येथे मागील दोन दिवसांपासून खैरून बी घराबाहेर दिसल्या नाहीत अशी माहिती शेजारी राहणाऱ्या महिलेने खैरुन बी यांचा मित्र सलीम मणियार (वय 35, रा. पाषाण) यांना यांना दिली. बुधवारी रात्री सलीम हे खैरुन बी यांच्या घरी आले. घरात बघितले असता खैरुन बी या जमिनीवर पडल्या होत्या. त्यांच्या तोंडातून फेस येत होता. सलीम यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

आरोपी पती हैदर याने खैरून बी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण केले. खैरून बी मुलांना घेऊन रावेत येथे राहण्यास आल्याच्या रागातून त्याने मंगळवारी (दि. 21) दुपारी चार वाजताच्या सुमारास वस्त्राच्या नाडीने गळा आवळून खैरून बी यांचा खून केला. त्यानंतर तो तिन्ही मुलांना घराजवळील रस्त्यावर सोडून निघून गेला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.