Ravet Crime News : गोकुळ हॉटेलमध्ये राडा; रेखा चित्र आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा लावला शोध

तब्बल नऊ महिने सुरु होता तपास

एमपीसीन्यूज : जेवणाचे बील मागितल्याने हॉटेलमधील वेटर, मालक आणि सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन पसार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रावेत पोलिसांना यश आले. केवळ टोपण नावांवरून तसेच आरोपींचे स्केच आणि तांत्रिक विश्लेषण या आधारे पोलिसांनी या चारही  आरोपींना नऊ महिन्यांनंतर  ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची कारवाई सुरु आहे.

रावेत येथील हॉटेल गोकुलमध्ये नऊ महिन्यांपूर्वी म्हणजेच 6 डिसेंबर 2019  रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली होती.

युवराज नवनाथ कुदळे ( वय -19, रा. भूमकर वस्ती, वाकड), ओंकार पोपट साठे ( वय 22, रा. केमसे वस्ती, वाकड, मूळ रा. ओव्हळे, ता. मावळ ), चेतन उर्फ सागर रतन येवले ( वय 20, पाचाणे, ता. मावळ ) आणि अब्जल मेहबूब शेख ( वय 21, रा. भूमकर वस्ती, वाकड, मूळ रा. सौवना, ता. चिखली, जि. बुलढाणा), अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी हॉटेलचा वेटर मोनू मदनचंद पाटील ( वय 19, रा. गोकुळ हॉटेल, रावेत ) याने फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांच्या हॉटलेमध्ये जेवण केले होते. त्याचे बिल वेटर पाटील यांनी मागितले. त्यावरून चिडून आरोपींनी फिर्यादी तसेच हॉटेलचे मालक कुणाल भेगडे यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या सुरक्षारक्षक मनोजकुमार साह यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली. यामध्ये साह याचा स्मृतिभ्रंश झाला होता.

घटनेनंतर आरोपी होंडा सिटी कारमधून पसार झाले. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपींची नावे युवराज, पिंट्या, चिन्या आणि बारक्या असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र, आरोपींचा ठावठिकाणा तसेच त्यांची पूर्ण नावे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश येत नव्हते.

त्यामुळे युवराज, पिंट्या, चिन्या आणि बारक्या अशी टोपण नावे असलेल्या अनेक गुन्हेगारांची पोलिसांनी चौकशी केली. तसेच आरोपींकडे असलेल्या व फिर्यादी यांनी वर्णन केलेली होंडा सिटी कार वापरणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र, यामधूनही आरोपींचा शोध लागू शकला नाही.

अखेर पोलिसांनी फिर्यादी यांनी केलेल्या वर्णनावरून आरोपींचे स्केच तयार करून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तब्बल नऊ महिन्यांनंतर आरोपींची नावे निष्पण्ण केली. त्याआधारे या सर्व आरोपींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.

सध्या या आरोपींच्या अटकेची कारवाई सुरु असल्याची माहिती रावेत पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी दिली.

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईकपाटील यांच्या मार्गदर्शनखाली रावेत चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, पोलीस अंमलदार आकाश जाधव, संतोष धवडे, संजय जाधव, नंदकुमार राऊत, गणेश नागरगोजे, योगेश गुळींग, खासगी संगणक तज्ज्ञ पुष्कर झांट्ये आदींनी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.