Ravet Crime News : रावण टोळी प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त शस्त्रासह एकत्र आलेल्या सहा गुन्हेगारांना अटक

एमपीसी न्यूज – रावण टोळीचा म्होरक्या कै. अनिकेत जाधव याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेल्या सहा गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. हे गुन्हेगार पिस्तुल घेऊन वाढदिवस साजरा करण्यासाठी शुक्रवारी (दि. 23) एकत्र आले होते. टोळीच्या म्होरक्याचा वाढदिवस साजरा करून हे आरोपी प्रतिस्पर्धी टोळीला ‘रिप्लाय’ देणार होते.

अनिरुध्द ऊर्फ विकी ऊर्फ बाळा राजु जाधव (वय 24, रा. जाधववस्ती रावेत, पुणे), धिरज दिपक जयस्वाल (वय 26, रा. रस्टण कॉलनी, बिजलीनगर रोड, दत्तमंदीराजवळ, चिंचवड, पुणे), रोहन राजेंद्र कांबळे (वय 24, रा. गिरीराज हौसींग कॉम्प्लेक्स, बिजलीनगर चिंचवड पुणे), अमित भगिरथ मल्लाव (वय 26, बिजलीनगर चिंचवड पुणे), मंगेश देवीदास नाटेकर (वय 22, रा. रमाबाईनगर, रावेत पुणे), अक्षय लहु चौगुले (वय 23, रा. रस्टण कॉलनी, बिजलीनगर रोड, दत्त मंदीराजवळ, चिंचवड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीजण रावण टोळीचा पुर्वीचा म्होरक्या मयत अनिकेत जाधव याचा जन्मदिवस केक कापून साजरा करुन विरोधी टोळीला रिप्लाय देणार असल्याची माहीती पोलीस अंमलदार शुभम कदम यांना मिळाली. त्यामुळे गुंडा विरोधी पथकाने जाधववस्ती, रावेत येथे अनिकेत जाधव याच्या घराला वेढा घातला. अनिकेत जाधव याच्या घरासमोर सहाजण आले असता पोलिसांनी छापा टाकून रावण टोळीच्या सहा जणांना ताब्यात घेतले.

त्यामध्ये रावण टोळीचा प्रमुख आरोपी व मयत अनिकेत जाधव याचा भाऊ अनिरुध्द ऊर्फ विकी ऊर्फ बाळा राजू जाधव हा देखील होता. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा आढळला. पोलिसांनी पिस्तुल आणि काडतुसे जप्त करून सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या.

अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना 25 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुंडा विरोधी पथकाने लांडगेनगर, भोसरी येथे दुसरी कारवाई केली. त्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. क्षितीज सुभाष जाधव (वय 19, रा. केएम मार्टसमोर, लांडगेनगर, भोसरी, पुणे), प्रतिक रोहीदास ससाने (वय 22, रा. लांडगेनगर, भोसरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या आरोपींनी कोयत्यासह सेल्फी फोटो काढून तो फोटो व्हाटस ॲप स्टेटसवर ठेवला असल्याची माहिती पोलीस नाईक विजय तेलेवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन धारदार कपयते जप्त केले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुंडा विरोधी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गणेश मेदगे, विजय तेलेवार, रामदास मोहिते, प्रमोद गर्जे, शुभम कदम यांच्या पथकाने केली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.