Ravet: संत श्री सावता महाराज यांचे विचार प्रत्येकाने अंगिकरावे- हभप भुजबळ महाराज

Ravet: Everyone should adopt the thoughts of Sant Shri Savata Maharaj says Bhujbal Maharaj उदार आणि सर्वसमावेशक तत्त्वावर संत ज्ञानदेव, नामदेवांच्या भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची उभारणी झाली.

एमपीसी न्यूज – कर्तव्य आणि कर्म करीत राहणे ही खरी परमेश्वरभक्ती होय. अशी शिकवण देणारे संत श्री सावता महाराज यांचे विचार प्रत्येकाने अंगिकरणे आवश्यक आहे असे मत हभप महादेव महाराज भुजबळ यांनी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले.

महात्मा जोतिबा फुले मंडळ आणि माळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सावता माळी यांच्या 725 व्या संजीवन समाधी सोहळा साधेपणाने चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी येथे फेसबुकच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमावर बंधने घालण्यात आली आहेत. त्यामुळे केवळ पाच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी, सचिव विश्वास राऊत, वैजीनाथ माळी, किशोर माळी, बापूसाहेब गोरे आदी उपस्थित होते.

प्रवाचनाच्या वेळी हभप भुजबळ महाराज म्हणाले, उदार आणि सर्वसमावेशक तत्त्वावर संत ज्ञानदेव, नामदेवांच्या भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची उभारणी झाली. या संप्रदायातील सर्व संत अध्यात्मनिष्ठच होते. त्यांचे कार्य तर नि:संशय धार्मिक स्वरूपाचे होते, तरी देखील त्यांच्या तत्त्वनिरूपणात आणि भक्तीपर वाङ्मयात सामाजिक आशय ओतप्रोत भरून राहिला आहे.

किंबहुना या सामाजिक आशयाच्या आगळेपणामुळेच वारकरी पंथाला इतकी लोकप्रियता लाभली आहे. ज्यांना सामाजिक जीवनातील जडत्त्व व अपप्रवृत्ती नष्ट करून त्याला नवे वळण देण्याची आवश्यकता वाटली, त्यांनी आपल्या सर्व सिद्धीसाठी धार्मिक प्रबोधनाची कास धरली.

दीपस्तंभ एकाच जागी स्थिर राहून अंधाऱ्या रात्री लोकांना अचूक मार्गदर्शन करतो. धैर्याने वाटचाल करण्याचे प्रोत्साहन देतो.

एकाच जागी स्थिर राहून विठ्ठल भक्तीचा दीप त्यांनी उजळला. त्या सावता महाराजांचे पावन चरित्र, प्रेरक व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी कर्तृत्व याची उज्ज्वल यशोगाथा ही तुमची आमची लाख मोलाची ठेव ठरली.

उदरनिर्वाहासाठी दिवसभर काबाडकष्ट करीत राहण्यापलीकडे ज्यांच्या जीवनाला काही अर्थ नव्हता, समग्र जीवन उजळून टाकणाऱ्या विशुद्ध धर्मभावनेचे स्वरूप त्यांनी सर्व थरातील लोकांना निरूपण कीर्तनाद्वारे विशद करून सांगितले.

त्यात एकांगीपणा कुठेही नव्हता. अंधश्रद्धा, कर्मठपणा, क्षुद्रदेवता भक्ती, दांभिकता व बाह्य अवडंबर यावर त्यांनी कुणाचीही भीडमुर्वत न ठेवता नि:शंकपणे कोरडे ओढले.

संत सावता माळी यांचे विचार अर्थपूर्ण आहेत. पोटापाण्याचा व्यवसाय हा प्रत्येकालाच करावा लागतो. तसे पाहिले तर हे संत उत्तम कारागीर होते. स्वत:चा व्यवसाय सांभाळून त्यांनी परमात्मा उपासना चालू ठेवली होती.

अशा थोर पुण्यात्म्याचा शेवटही तितकाच गोड आहे. प्रात:काळी स्नान करुन त्यांनी दैनंदिन यथाविधी केली आणि आपला देह अनंतात विलीन केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.